मुंबईत पाहण्या सारखी ३० ठिकाणे

0
73793
Mumbai Best Places
Mumbai Best Places

गेट वे ओफ इंडिया

Gateway-of-India Mumbai
Gateway-of-India Mumbai

मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे.

भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे.

वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या.

गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते.

त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.

गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात.

नरिमन पॉइण्ट

Marine Drive, Mumbai
Marine Drive, Mumbai

मुंबईचे “मैनहट्टन” म्हणून ओळ्खले जाणारे ठिकाण म्हणजे नरिमन पॉइण्ट ! नरिमन पॉइण्ट हे मुंबईतील मुख्य आणि देशातील पहिले केंद्रिय व्यापारी स्थळ आहे. या भागाला एक पारसी समाजसेवक खुर्शीद फ्रामजी नरिमन यांच्या नावावरून हे नाव दिले गेले.

समुद्राच्या भागाचे पुनर्वसन करून हा भाग वसवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे येथे वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील हे काळ्या बाजारातून आणण्यात आले होते.

नरिमन पॉइण्ट जास्त उजेडात आले ते २००७ साली या भागातील एक रहिवासी जागा (flat) ८.६२ लाख अमेरिकन डोलर्स म्हणजे (९७,८४२ रु.) प्रती चौरस फूट या दराने विकला गेल्यावर ! येथे अनेक विदेशी कंपन्या ची मुख्यालये आहेत.

महाराष्ट्राचे राजकीय मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे विधान भवन देखील देखील येथेच आहे. येथून “कफ परेड” आणि “ब्याक्बे रेक्लमेशन” हि मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे दिसतात.

हँगिंग गार्डन्स

Hanging Gardens of Mumbai
Hanging Gardens of Mumbai

मुंबईच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उतरार्धात मलबार हिलच्या उंच टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. तब्बल ३० दशलक्ष गॅलन पाणी मावेल इतकी मोठी टाकी उघडीच होती.

त्यामधील पाणी गढूळ होण्याची शक्यता होती म्हणून या टाकीवर बगीचा करण्याच ठरले आणि १२५ वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डन्सची स्थापना १८८० साली करण्यात आली. १९२१ साली बागेची डागडुजी करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोजशहा मेहता यांचे नाव देण्यात आले.

या गार्डन्सचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील वृक्षराई. त्यामुळे भर दुपारीसुद्धा उन्हाची झळ न लागता निवांत शांत बसता येते. त्याचबरोबर या उद्यानाच्या आवारात हिरवेगार झाडांना गाय, जिराफ, हत्ती इत्यादी प्राण्याचा आकार देण्यात आला आहे.

याच गार्डन्सच्या समोरच असलेलं पार्क म्हणजे कमला नेहरू पार्क. या पार्कमधील प्रमुख आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. २० फुट उंच असलेल्या या बुटातून साऱ्या मुंबईचे दर्शन घडते. त्याचबरोबर या पार्कातून पूर्ण चौपाटी, मरीन ड्राईव्ह व संपूर्ण मुंबईचे नयनरम्य दर्शन घडते.

या गार्डनला भेट देण्यासाठी आपण चर्नीरोड स्थानकावरून जाऊ शकता. या स्थानकावरून या पार्कात आपण टॅक्सी ने १५ ते २० मिनिटात पोहचू शकतो. वेळ:- सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

नेहरू तारांगण

Nehru Planetarium
Nehru Planetarium

वरळीचं नेहरू तारांगण सर्वांचे आकर्षण. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थीएटर. या गोलाकार थीएटरमधल्या प्रदर्शनात खुर्च्यांमध्ये निवांत झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणात चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली येतात कि काय असे भासते.

ग्रह-ताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही या प्रदर्शनात मांडलेल्या असतात. विविध ताऱ्यांच्या नावाने इथे वजन काटे लावण्यात आले असून यावर उभे राहून वजन केल्यास त्या ताऱ्यांवरील तुमचे वस्तुमान किती हे समजते.

या केंद्रात १४ कार्यशाळा असून त्यामध्ये भारतातील कला, बौद्धिकता व विविध सांस्कृतिक प्रदर्शने पाहता येतात. त्याचबरोबर या केंद्रातील डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन भारताची कथा सांगते. येथे आपण दादर, भायखळा, महालक्ष्मी या स्थानकावरून बसने जाऊ शकता.

बस क्र- २८, ३३, ८०, ५२१, ८४, ९१, ९२, ९३
वेळ- सकाळी ११ ते ५, सोमवारी सुट्टी.

तारापोरवाला मत्स्यालय

Taraporewala Aquarium
Taraporewala Aquarium

मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय.

सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली.

त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रु खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता.

असे हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे नजरेस पडतात.

या मत्स्यालयात १०० हून अधिक मासे असून आजही येथे ७२ प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील १०० प्रजाती आहेत. यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो.

त्याचबरोबर माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहितीही मत्स्यालयात फेरफटका मारताना सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. अशा या इमारतीत तळमजल्यावर मत्स्यालय आणि दुसऱ्या मजला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्यालयाकरिता आहे.

अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किवा टक्सीने जाऊ शकता.

वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.

महालक्ष्मी मंदिर

Mahalakshmi Temple, Mumbai
Mahalakshmi Temple, Mumbai

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले.

या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते.

त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली.

त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत.

या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. त्यांचे विनाआवरण दर्शन घ्यायचे असल्यास रात्री मंदिर बंद करताना जावे लागते.

हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिराला लागूनच हार, फुले, प्रसाद व मिठाईची दुकाने आहेत.

नवरात्री मध्ये या मंदिराला फुलांनी सजवले जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी खुप मोठी गर्दी उसळते. तसेच येथे जत्रा ही भरते.

महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी- एका माणसे किमान भाडे 10 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.

हाजी अली

Haji Ali Dargah
Haji Ali Dargah

सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा. १४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात आली आहे.

दुरून हि दर्गा पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगण्याचा आभास होतो. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हि दर्गा आहे. या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही निराळाच..

या दर्ग्यापर्यंत जाण्यासठी एक पायवाट आहे हि पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा देसेनाशी होते आणि जणू हि दर्गा समुद्रावर अधांतरी तरंगल्या सारखी भासते. दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा संगम आढळतो. दर्ग्यातील कबरीभोवती चारही बाजूंनी चांदीची चौकट असून सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे.

या नक्षीकामात अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहे. या दर्ग्यासमोर महालक्ष्मी देवीचे मंदिरही आहे. थोडे पुढे गेलात कि घोड्याच्या शर्यतीचे मैदान म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पाहता येतील.

या दर्ग्याचे व येथील ठिकाणे पाहून झाल्यावर हाजी अलीला जो मुख्य सिग्नल आहे तिथे उभे असलेले प्रशस्त हाजी अली ज्यूस सेंटर. थंडगार मिल्कशेक, सरबत, फालुदा या वेगवेगळ्या व्हरायटीबरोबर येथे आंबा, चिकू, सफरचंद अशा विविध फळांपासून बनवलेले क्रीम ही येथील खासियत. तर नक्कीच देवदर्शन झाल्यावर या ज्यूस सेंटरला भेट द्या.

या दर्ग्याला भेट द्यायला तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून जाऊ शकता किवा तुम्ही बसने हि प्रवास करू शकता.

बस क्र:- ३३, ३७, ६३, ८१, ८२, ८४, ९२, ९३, १२४, १२५, ३५१, ३५७, ३८५, ५२१.

सिध्दीविनायक गणपती

Siddhivinayak Temple, Mumbai  
Siddhivinayak Temple, Mumbai

मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो.

नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिध्दीविनायकाची ओळख आहे. गणपतीची मूळ मुर्ती 2.6 इंच व 2 इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. उजवी सोंड, माथ्यावर मुकुट, चार हात, दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी, मूर्तीच्या गळ्यात सर्पाचे जानवे असे या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे.

उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे तो सिध्दीविनायक म्हणून ओळखला जातो. तसेच या गणपतीला लग्नी गणेश असे ही म्हटले जाते.

सकाळी 6 वाजता यथासांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.

जवळचे स्टेशन – दादर.
दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत.

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय(प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)

Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya

मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय.

ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी यांचा आराखडा तयार करून याची उभारणी केली असून स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

संग्रहालयात भारत, चीन, जपान आणि अन्य देशांच्या कलाकृती येथे पहावयास मिळतील. याव्यतिरिक्त नौकावाहन, मराठा मुघल सरदरांच्या वापरातील शस्त्रे, अनेक शिल्पकला, अन्य मुर्त्या या विशेष दालनात पाहण्यास मिळतील.

इथले विविध दालन व वस्तू पाहताना दिवसही अपुरा पडतोय कि काय असे नक्कीच तुम्हाला वाटेल. समस्त विश्वाच्या कलाकृती व इतर साहित्य व अन्य कृतींची माहिती करून घेण्यासठी नक्की या वास्तुसंग्रहालयास भेट द्या.

वेळ:- मंगळवार ते रविवार सकळी १०.१५ ते सायं ५.४५ वाजेपर्यंत.
शुल्क:- प्रवेश शुल्क-५ रु, प्रौढांसाठी- ३० रु

वस्तूसंग्रहालयात जाण्यासाठी- छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून बस क्र. १४, ६९, १०१, १३०
चर्चगेट स्थानकावरून बस क्र. ७०, १०६, १२२, १२३, १३२

ताज महल हॉटेल

The Taj Mahal Palace Hotel
The Taj Mahal Palace Hotel

ताज महल हॉटेल हे मुंबई च्या कोलाबा भागातील गेट वे ओफ इंडिया समोरील एक अत्यंत मोहक आणि सुंदर पंचतारांकित होटेल आहे . तसेच आपल्या ऐतिहासिक महत्व आणि विशिष्ठ बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे .

हे हॉटेल प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटा ग्रुप च्या मालिकेचे आहे , जवळजवळ १०९ वर्ष जून्या ह्या हॉटेल ने जगभरातल्या अनेक दिग्गजाची सेवा केली आहे. जसे बिल क्लिंट्न , प्रिन्स ऑफ वेल्स , हिलरी क्लिंट्न , बराक ओबामा, इत्यादींचा त्यात समावेश आहे.

ह्या इमारतीत एकूण ५६५ खोल्या आहेत. हे हॉटेल १६ डिसेंबर १९०३ साली सुरु करण्यात आले . पहिल्या महायुद्धाच्या वेळी ह्या इमारतीचा होस्पिट्ल म्हणून वापर करण्यात आला होता. असं म्हणतात की जमशेदजी टाटा यांना एका होटेल मध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हे होटेल बनवण्याचा निर्णय घेतला.

ह्या वास्तू विषयीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेट वे ओफ इंडिया समोरून जो भाग दिसतो तो ह्या हॉटेल चा मागील भाग आहे, तर मुख्य प्रवेश द्वार याच्या विरुद्ध दिशेला आहे. आता त्याच्याच बाजूला ताज महल टोवर्स म्हणून दुसरी इमारत उभारण्यात आली आहे.

फ्लोरा फाउन्टन

Flora Fountain
Flora Fountain

वीर नरीमन रोड आणि डी.एन. रोड यांच्या नाक्यावर उभ असलेल फ्लोरा फाउन्टन हे सुमारे २५ फुट उंचीच शिल्प. त्याच्या चारही बाजूला युरोपीय पुराणकथांमधल्या बायकांच्या मूर्ती आणि त्याच्या टोकावर फ्लोरा या रोमन देवीची पूर्णाकृती आहे.

फ्लोरा ही फुलांची देवता , तिच्या पूजनाने धन , एश्वर्य व आनंद प्राप्त होतो अशी समजूत होती. या शिल्पातून पूर्वी अखंड कारंजी थुई थुई उडत असत. याच्या चौथऱ्याच्या बाजूला पायऱ्या होत्या. तिथे संध्याकाळी गोरे साहेब आपल्या माडमांना घेऊन बसायचे. शनिवारी रात्री हा परिसर माणसांनी फुलून जायचा.

आज फ्लोरा फाउन्टनच्या विस्तीर्ण प्रांगणाला हजारो धावत्या गाड्यांचा विळखा असतो. मधूनच जाणाऱ्या पायरस्त्यावरून चाकरमाने धावत असतात आणि एका बाजूला नायलॉन साड्यांपासून स्वस्तातली बॉलपेन आणि जडीबुटी विकणाऱ्यापर्यंत अनेक फेरीवाल्यांचा गराडा असतो.
एकूणच फ्लोरा फाउन्टनही आता अस्सल मुंबईकर झाल आहे !

टाऊन हॉल

Town Hall
Town Hall

१८० वर्षे जुना व मुंबईतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाचा साक्ष देणारं सभागृह म्हणजे ‘टाऊन हॉल’. हर्निमल सर्कलसमोर दिमाखात उभी असलेली ही इमारत. या हॉलच्या पाय-यांची संख्या ३० असून समोरच्या भागात तुस्कान डोरिक पद्धतीचे ८ खांब आहेत.

नियो क्लासिकल शैलीतील इमारत असून या इमारतीचे बांधकाम कर्नल कॉऊपर व कर्नल बॅडिग्टन यांनी केले आहे. हॉलमध्ये प्रवेश केल्यास मुख्य भाग दिसतो तो येथील सुंदर दरबार आहे. हॉलच्या पूर्वेकडील भागात एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात देशी-विदेशातील ८ लाखांवर दुर्मिळ ग्रंथसंपदा असून या ग्रंथालयाचा उपयोग अनेक संशोधकांना आणि अभ्यासकांना होतो.

त्याचबरोबर या ग्रंथालयात मुघल राजा अकबर याच्या काळातील १००० नाणे म्हणजे मोहरा आहेत. या हॉलमध्ये मुंबईच्या विकासाला हातभार लावणाऱ्या गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन , मुख्य जज्जस्टिफन नॅबिग्टन, गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन , सर जमशेटजी जिजिभाई , जगन्नाथ शंकरशेठ, गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या व्यक्तींचे पुतळे आहेत.

वेस्टर्न रेल्वेच्या चर्चगेट स्थानक व छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानक या दोन्ही स्थानकावरून हे जवळ आहे. टाऊन हॉल हा सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत खुला असेल.

छत्रपती शिवाजी टर्मिनस : (सी.एस.टी. स्टेशन)

CST Mumbai
CST Mumbai

काही वर्षांपूर्वी याचे नावं व्हिक्टोरिया टर्मिनस हे होते. एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या तीन वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्प.ह्या इमारतीच्या कौशल्यपूर्ण आणि यथोचित अशा रचनेमुळे त्याचप्रमाणे नक्षीदार सुंदर कमानींमुळे ही इमारत एखाद्या भव्योदात्त चर्च सारखी दिसते.

मध्यभागी मोठा घुमत आणि वर निमुळते होत जाणारे मनोरे ह्यामुळे लंडनच्या वेस्ट मिनिस्टर एबे ह्या इमारतीशी तिचे साधर्म्य जोडले गेले आहे. संपूर्ण कोरीव दगडांच्या ह्या इमारतीवर प्लास्टरचे नक्षीकाम, नक्षीदार गडद रंगाच्या काचा असलेल्या इमारतीच्या खिडक्या आणि घुमट व मनोरे ह्यांवरील खिडक्या या संपूर्ण वास्तूला उठावदार बनवतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली , नॅशनल पार्क बोरीवली

Sanjay Gandhi National Park
Sanjay Gandhi National Park

मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असे ही म्हणतात. १०४ चौ.की.मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या ४० वर्षांपासून हौशी पर्यटकांचे मन तृप्त करत आहे.

दरवर्षी जवळपास २० लाख पर्यटक येथे भेट देतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. सरकार तर्फ़े येथे व्याघ्र प्रकल्प राबवला जात आहे, तर या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीची देखील सोय उपलब्ध आहे.

तसेच येथे निरनिराळ्य़ा प्रकारचे वृक्ष, किटक, पक्षी यांच्या प्रजाती सुध्दा बघायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गप्रेमींचे अनेक शिबिरांचे आयोजन येथे केले जाते. येथे एक नदी देखील आहे ज्यात नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे,

आणि वर्षाचे बाराही महिने ते पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. याच बरोबर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलेली वनराणीही मीनी ट्रेन लहानांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीची झाली आहे. राष्ट्रपिता महात्मागांधीच्या स्मरणार्थ येथे गांधी टोपीची प्रतीकृतीही उभारण्यात आली आहे.
जैनमंदिर (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली)

क्रॉफर्ड मार्केट ( महात्मा फुले मंडई )

Mahatma Jyotiba Phule Mandai
Mahatma Jyotiba Phule Mandai

मुंबईतील सर्वात मोठे मार्केट म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांचे नाव या मंडईस ठेवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात या मार्केटचे नाव महात्मा फुले मंडई करण्यात आले.

सन १८३५ ते १८६९ मध्ये बांधण्यात आलेल्या या मंडईस त्यावेळी २० लाख रुपये खर्च आला असून मंडईच्या उभारणीसाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथील टिकाऊ दगडांचा वापर करण्यात आला. ही मंडई त्याच्या वरील उंच घड्याळ ,टॉवर व घुमटाने शोभून दिसते.

येथे फळांपासून ते माशांपर्यंत तसेच दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू या एक एकाच आवारात मिळण्याची सोय आहे. या मार्केटमध्ये आपल्याला विविध फळे , सुकामेवा यांच्या बरोबर कवठ, रामफळ व केळ्यांचे कितीतरी प्रकार पाहायला मिळतील.त्याचबरोबर विविध देशी-परदेशी फुलांचे प्रकार मन मोहून टाकतात.

या मार्केटमध्ये जाण्यासाठी सी.एस.टी स्थानकावरून पायी जाऊ शकता.

कुलाबा कॉजवे मार्केट

Colaba Causeway Market
Colaba Causeway Market

मुंबईतील अजून एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे कुलाबा कॉजवे मार्केट. रिगल थीएटरवरून सरळ खाली जाणारा अर्थात शहीद भगत सिंग मार्ग म्हणजेच कुलाबा कॉजवे मार्केट. रस्त्याच्या दुतर्फा मार्केट असून, एका बाजूला मोठ-मोठाले शोरूम व दुसऱ्या बाजूला स्टॉल्स असे या मार्केटचे स्वरूप आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ असलेले हे हाय प्रोफाइल मार्केट काहीसाठी स्टेटस सिंबॉलही असून ट्रेंडी आउटफिटपासून युवावर्गाच्या गरजेच्या सर्व वस्तू येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर घर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूबरोबरच जीन्स, सिल्क जीन्सचे कुर्ते, कुर्ते, शूज, बांगडया इत्यादी वस्तूंची येथे खरेदी करायला मिळते.

विशेषतः या मार्केट मध्ये तर्हेतर्हेची घड्याळे, जुन्या काळातील घड्याळे, त्याचबरोबर येथे मिळणारी स्टोन ज्वेलरी, मंकी ज्वेलरी हि येथील शॉपिंगची खासियतच आहे. तर घराला वेगळे लुक देणारे सामानही इथे आहे. याशिवाय लहानग्यांचे कपडे आणि सॉफ्ट टॉइजच भले मोठे दुकानं आहेत.

मार्केटमध्ये खरेदी करून वा फेरफटका मारून थकलो तर येथे पेटपूजेची सोयही येथे आहे. येथे लिओपोड केफे, डॉमिनोझ शिवाय मधेच भेलपुरी पानीपुरीचे दुकानही आहेत.

मनीष मार्केट

Manish market
Manish market

जर तुम्हाला सेल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रोनिक वस्तू, सेकंड ह्यांड मोबाईल किंवा चाइना मोबाईल खरेदी करावयाचा असेल तर मनीष मार्केट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मरीन लाइन्स जवळ क्रोफ़र्ड मार्केट च्या शेजारी जे जे च्या पुलाखाली हे मार्केट वसलेले आहे.

संपूर्ण मार्केट मध्ये केवळ फोन्स आणि इलेक्ट्रोनिक वस्तूच मिळतात . या ठिकाणी जुने आय फोन , ब्ल्याकबेरी मोबाईल अगदी स्वस्तात म्हणजे ६००० ते १०००० पर्यंत मिळतात .मरीन लाईन्स स्टेशन पासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर हे आहे.

आरे कॉलनी व छोटा काश्मीर

Chhota Kashmir
Chhota Kashmir

गोरेगाव म्हटले कि पहिला डोळ्यासमोर येते ती आरे कॉलनी १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. येथे मुंबईतील सर्वात जुनी दुग्धशाळा आहे. जिचे उद्घाटन पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. येथे दुध उत्पादन करून ते जवळच्या भागात स्वस्तात विकावे या हेतूने आरे डेरी ची स्थापना करण्यात आली होती.

या कॉलनीमध्ये ३ बागा देखील आहेत. परंतु त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय बाग म्हणजे छोटा काश्मीर. टेकडीवजा जागेवर हि बाग वसवली आहे. जी आरे कॉलनीचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेजवळ एक तलावही आहे ज्याचा काही भाग मत्स्यबीज निर्मितीसाठी राखून ठेवला आहे व उर्वरित भागात बोटिंगची सोय करून दिली आहे.

येथील फुलझाडे व हिरवळीमुळेच या बागेला छोटा काश्मीर हे नाव पडले. पूर्वीच्या काळी येथे आल्यावर आपण मुंबई मध्ये नसून काश्मीर मधेच आहोत असे वाटायचे. म्हणूनच पूर्वी येथे बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण व्हायचे. तरुणाईसाठी हि बाग आवडीची होऊ लागली आहे.

आरे कॉलनी मध्ये तपेश्वर मंदिर देखील आहे. छोटेसे पण शांत असे हे मंदिर कॉलनीच्या शेवटच्या टोकाला आहे. येत्या काही वर्षात आरे कॉलनी चे नुतनीकरण होणार आहे. ज्यात फिल्मसिटी सुद्धा बांधण्यात येणार आहे.

चर्चगेट

Churchgate
Churchgate

चर्चगेट हे पश्चिम रेल्वे लाइन वरील एक उपनगरिय रेल्वे स्थानक आहे. हे दक्षिण मुंबईत वसले असुन त्याला चर्चगेट हे नाव चर्च गेट रोड ह्यावरुन पड्ले आहे. पूर्वी कोलाबा हे पश्चिम रेल्वे वरिल मुख्य स्थानक होते मात्र १९३१ नंतर चर्चगेट स्थानकाला हा मान मिळाला. पश्चिम रेल्वे चे मुख्यालय येथे आहे.

चर्चगेट स्थानकाच्या बाहेरच एरॊस थिएटर आहे, क्रिकेट साठी प्रसिध्द असे वानखेडे स्टेडीयम देखिल येथेच आहे.

नेहरू विज्ञान केंद्र

Nehru Science Centre
Nehru Science Centre

विविध वैज्ञानिक चमत्काराचा खजिना म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र. केवळ शाळकरी मुलानांच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या केंद्रात पाहायला मिळतात. अगदी विजेचा शोध कोणी लावला इथपासून ते झाडावरचे फळ जमिनीवर का पडते असे अनेक प्रश्नाचे सोप्या भाषेत उत्तर मिळते.

सुरुवातीला या केंद्रात प्रवेश केल्यावर डायनासोर, प्राचीन हत्ती यांची व इतर जुने जीवजंतूंची माहिती आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय नाक, कान, स्पर्श यांच्या वापराचे काही खेळ, वेर्चुअल लाटा अश्या विविध खेळांची एक वेगळीच रचना पाहता येते. आगगाडी, विमान, विमानवाहू नौका, विविध गाड्या यांची जुनी मॉडेल्सही येथे पाहायला मिळतात.

त्याचबरोबर वैज्ञानिक जिज्ञासा पूर्ण करणारी अनेक उपकरणे असून आपल्याला अणुविभागही पाहता येतो. त्याचबरोबर या केंद्रामध्ये सायन्स फॉर चिल्ड्रेन, प्रवास इतिहासाचा, प्रकाश, ध्वनी, विमाने आणि अंतराळयाने असे विविध विभाग असून प्रत्येक विभागात त्या-त्या विषयातील मुलभूत तत्वे, माहिती व प्रत्याशिके मांडली आहेत.

ग्लोबल विपश्यना पगोडा

Global Vipassana Pagoda
Global Vipassana Pagoda

नुकतेच काहि वर्षांपूर्वी बांधलेले किंबहूना अजूनही बांधकाम चालू असलेले मुंबईतील हे सर्वात नवखं आकर्षण आहे. याचे नावच असे आहे. बाहेरुन जरी हे मंदिर वाटत असलं तरी हे मंदिर नसून एक विपश्यना केंद्र आहे. येथे ध्यान धारणा शिकवली जाते, अर्थात आर्ट ऒफ लिव्हींग शिकवले जाते.फार वेगळ्य़ा पध्दतीने बांधण्यात आलेली ही वास्तू आहे, व मुंबईतील आठवे आश्चर्य म्हणून नावारुपास येत आहे. हे घुमटाकार असून ह्याची उंची आणि व्यास ३२५ फ़ूट आहे. येथे ८००० लोक एका वेळी बसून ध्यान करु शकतात.

म्यानमार येथील विपश्यना केंद्राकडून याचे दरवाजे तर थायलंड येथील केंद्राकडून याचा सोनेरी रंग देणगीदाखल देण्यात आला आहे. घुमटाच्या शिखरावर १ कोटी रुपयांचा क्रिस्ट्लस्टोन बसवण्यात आला आहे व त्याच्या खाली सोन्याच्या ८ रींग्स बसवण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे सर्व बांधकाम भूकंप निरोधक आहे. ह्या पगोडाचा घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे, आणि पुढिल २००० वर्षे तरी या घुमटाला काहीही होणार नाही इतकं भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.

मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.येथे येण्यासाठी बोरीवली स्थानकापासून बस व रिक्षाची सोय उपलब्ध आहे तसेच समुद्र मार्गे बोटीने देखील येथे जाता येते.

एस्सेल वर्ल्ड

EsselWorld Mumbai
EsselWorld Mumbai

एस्सेल वर्ल्ड हे मुंबईतले किंबहुना भारतातले सर्वात मोठे amusement park आहे. एक मोठाली जत्राच म्हणा ना.
वेगवेगळ्या राईड्सचा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी येथे रोज १०००० लोक भेट देतात. हे पार्क ६४ एकर परिसरात उभारलेले आहे जे १९८६ मध्ये सुरु करण्यात आले होते.

येथे १०० पेक्षाही जास्त राईड्स आहेत. त्यापैकी ३४ राईड्स या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. याचा जास्त भर हा ड्राय राईड्स वर आहे. प्रत्येक वायोगातालील लोकांसाठी येथे राईड्स उपलब्ध आहेत.

EsselWorld
EsselWorld

जर तुम्हाला राईड्सची भीती वाटत असेल तर डान्स फ्लोर, आइस स्केटिंग, बोलिंग एले, तुमचा मन नक्कीच आकर्षित करून घेईल.येथे येताना संपूर्ण दिवस राखून यावे. कारण १०० राईड्सचा आनंद घेताना दिवस कसा निघून जातो कळतही नाही.
पण बालपण मात्र नक्की परत येते..

एलिफंटा लेणी

Elephanta Caves
Elephanta Caves

एलिफंटा लेणी ही मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला.

घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्‍यापासून १० कि.मी. दूर आहेत.

लेण्यावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणार्‍या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते.

शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.

समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय.

गिरगाव चौपाटी

Girgaum Chowpatty
Girgaum Chowpatty

मुंबईला भेट देण्यासाठी आला असल् तर मुंबईची पिकनिक या किना-याला भेट देण्याशिवाय पुर्णच होत नाही. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेला हा किनारा. मलबार हिलच्या टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे.

तरुण जोडप्यापासून ते कुटुंबांपर्यंत सर्वच मज्जा लुटण्यासाठी येथे येतात. या किनर्‍यावर नारळीपौर्णिमा तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येथे. सर्वांचा आवडता बर्फाचा गोळा हा वेगवेगळया फ्लेवर्स मध्ये उपलब्ध असतो. फिरून थकलो कि येथे खाण्यापिण्याची सोय हि खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पावभाजी, भुट्टा, भेल, पाणीपुरी इत्यादी चवीचे पदार्थ येथे सहजच उपलब्ध असतात.

या चौपाटीवर शुद्ध हवेमध्ये श्वास घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकाला आवडते.

वरळी सी-फेस

 

Worli Sea Face
Worli Sea Face

समुद्र आवडतो पण वाळू नाही आवडत, बीच वरचे वातावरण आवडते पण फेरीवाल्यांचा त्रास नाही आवडत. मग तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वरळी सी-फेस. मरीन ड्राईव्ह सारखाच हा वरळी सी-फेस. पूर्ण समुद्रकिनार्यावर २ किलोमीटर लांबीचा लांबलचक कट्टा. अतिशय स्वच्छ आणि शांत ठिकाण एका बाजूला गगनचुंबी इमारतींचे दर्शन. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी हे ठिकाण म्हणजे एखादी थेरेपीच म्हणावी लागेल.
जवळचे स्टेशन – दादर

बँड्रा बँडस्टॅंड

bandra bandstand
bandra bandstand

मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून दिसणार नाही इतका सुंदर सूर्यास्त आपल्याला बँडस्टॅंड येथून पाहायला मिळतो. एका बाजूला बांद्रा-वरळी सी लिंक आणि दुसऱ्या बाजूला बँडस्टॅंड असे अप्रतिम दृश्य आपल्याला बांद्रा फोर्ट वरून पहावयास मिळते.

बँडस्टॅंड येथील शांततेत आणि थंडगार वाऱ्यामध्ये दिवसभराचा थकवा नाही विसरलात तर नवलच असेल. बांद्रा हे स्टेशन वर्दळीचे असले तरी बँडस्टॅंड वर्दळीपासून काहीसे लांब आणि शांत ठिकाणी आहे. संध्याकाळी हे ठिकाण एखाद्या उत्तम चित्रकाराने खूप वेळ खर्च करून चितारले आहे असे भासते.

येथे येउन येथील शांत वातावरणात कुणीही रममाण होईल यावर मी पैज लावायला देखील तयार आहे.
कसे जायचे – बान्द्रा स्टेशन वरुन बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत.15- 20 मिनिटांत येथे पोहोचता येते.

जुहु बीच विलेपार्ले मुंबई जुहू चौपाटी-

Juhu Beach Vile Parle
Juhu Beach Vile Parle

मुंबई उपनगरातील सुंदर आणि स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आहे. मरीन ड्राइव्ह चौपाटीसारखेच जुहू चौपाटी येथे अनेक अन्नपदार्थचे स्टोल्स आहेत. हे ठिकाण लहान मुलांना आणण्यासाठी सुंदर आहे जेथे करमणूक, उद्यान, खेळाचे मैदान यांची दुहेरी पर्वणी आहे.

मुंबईच्या प्रसिद्ध अन्नपदार्थांपैकी पाणीपुरी, पावभाजी आणि भेलपुरीचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता बर्फाच्या गोळ्याची खूप दुकाने आहेत. येथील स्थानिक लोक सूर्यास्त पहाण्यासाठी येथे येतात.

जुहू चौपाटीला जाण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ या दोन्ही स्थानकावरून जाऊ शकतो. मुंबईला भेट देणारे पर्यटक या किना-याला नक्कीच भेट देतात.