नोटाबंदी अयशस्वी होण्याची जवाबदारी कोण घेणार ?

0
761
Being Marathi
Being Marathi

नोटबंदीचा फुगा एकदाचा फुटला. तो फुटणारच होता. आज ना उद्या. किती नोटा जमा झाल्या ते आरबीआयला सांगावे लागणारच होते. नाचक्की टाळण्यासाठी नोटांचा हिशोब लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून आरबीआय थकली. आरबीआयच्या आड लपलेले मोदी सरकार थकले. अखेर जीडीपीचे ह्या क्वार्टरचे आकडे यायच्या आधी नोटांचा हिशोब जाहिर केला नाही तर संशयाचा भोवरा मोठा होईल ह्याची जाणीव मोदी सरकारमधल्या ‘स्ट्रेटेजिस्ट’ कम ‘अर्थमंत्री’ कम अर्धवेळ ‘संरक्षणमंत्री’ कम पूर्णवेळ ‘मीडिया मैनेजमेंट मंत्री’ जेटली साहेबांना झाली असावी.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात ह्या निर्णयाचे स्थान काय असे जेव्हा भविष्यकाळ विचारेल तेव्हा “ठार वेडेपणा” हेच त्याचे वर्णन असेल. ज्या देशात 44.7 टक्के अर्थव्यवस्था ही हातावर पोट असणा-या गरीब वर्गावर आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांवर अवलंबून आहे त्या देशात एका रात्रीत असा आचरटपणा करणे हे काही साध्यासध्या बुद्धिमत्तेचे लक्षण नाही ! त्यासाठी नि:संशय मूर्खपणा ठासून भरलेला असावा लागतो !!

तो आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये असल्याचे परिणाम म्हणजे नोटबंदी !!!

त्याचे आर्थिक परिणाम काय झाले हे आपण आता निष्कर्षासहित वाचतो आहोत. हा निर्णय काळ्या पैश्यापासून सुरु झाला आणि दहशतवाद, नक्षलवाद, बैंकिग क्षेत्र, आयकर विभाग मजबूती करत करत डिजिटल व्यवहार पर्यंत पोचला. त्यातल्या प्रत्येक तथाकथित उद्दीष्टाचे कसे बारा वाजले हेसुद्धा आता दिसतेय. (अर्थातच, ज्याला बघायचे आहे त्याला.!)

इतके तोंड फुटल्यावरही काल #DeMonetisationsuccess नावाचा ट्रेंड सोशल मिडियावर चालवला गेला. हे करण्यासाठी उच्च नाही परमोच्च कोटीची निर्लज्जता असावी लागते. ती वरपासून खालपर्यंत असावी लागते.

हि निर्लज्जता कसली आहे माहितिये ?

132 लोकांचा नोटबंदीच्या विविध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणांमुळे मृत्यू झाला. त्याबद्दल अजिबात दु:ख नसलेली ही निर्लज्जता आहे.

देशात अक्षरशः लाखो लोक बेरोजगार झाले. त्यांना देशोधडीला लावल्यावरही नाचून दाखवायची ही निर्लज्जता आहे.

3 वर्षाच्या दुष्काळानंतर शेतक-यांना गेल्यावर्षी जरा दिलासा मिळत होता. पण पिकं येण्याच्या काळात नेमका हा निर्णय आला आणि कष्टांची माती झाली. त्या कष्टांचा अपमान करणारी ही निर्लज्जता आहे.

या सगळ्यातून 2 टक्के जीडीपी घसरला. म्हणजे तब्बल 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. तरीही त्याची काहीही फिकीर नसलेली ही निर्लज्जता आहे.

आणि एवढे सगळे झाल्यावरही आम्ही निवडणुकांत जिंकतो आहोत. मग कोण आमचे काय वाकडे करणार ह्या गुर्मीतून आलेली ही निर्लज्जता आहे.

मुळात नोटबंदी हा आर्थिक निर्णय नव्हताच. पोलिटिकल रॉबिनहुड प्ले करायचा तो प्रकार होता. आपण श्रीमंताना धडा शिकवत आहोत असे दाखवणारा हा प्रकार होता. आणि त्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. ठरत आहेत.

याचा अर्थ मात्र असा अजिबात नाही की ते नेहमीच ह्या खेळात यशस्वी होतील. अर्थव्यवस्थेवर झालेला खोल घाव आता जाणवू लागलाय. गुंतवणूक अशीच नगण्य राहिली आणि बेरोजगारी अशीच वाढत गेली तर ही जखम चिघळेल. आणि त्यावेळी स्थिती राजकीदृष्टयासुद्धा हाताबाहेर जाईल.

चिंता ही नाही की ह्याचे राजकीय पडसाद काय होतील. चिंता ही आहे की असंघटित मजूर, शेतकरी, लघु उद्योजक ह्यांच्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येवर काय दिवस येतील ? ते ह्या राजकीय नेतृत्वामुळे आलेल्या आर्थिक त्सुनामीत कुठे जातील ? आणि ह्यातून जे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल त्याचे काय ?

ज्यांना वातावरणात प्रक्षोभ ठेवून निवडणुका जिंकायचा हव्यास जडलाय त्यांना तर ही स्थिती हवीच आहे. त्यामुळे प्रश्न त्यांचा नाहीच.

प्रश्न तुमचा माझा आहे. राजकीय विचारांच्या पलिकडे देश महत्त्वाचा आहे. तो जरा नागवला जात असेल, करोडो लोकांना फसवून, उध्वस्त करून जर सत्तेची भूक भागवली जाणार असेल तर तुम्ही आणि मी त्याविरुद्ध बोलणार की नाही हा आहे !!