नवरात्रातील नऊ दिवस

0
2620

नवरात्र माहात्म्य

आश्विन महिन्यात साजरा केला जाणारा शारदीय नवरात्र हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. यावेळी पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.

नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.

Navratri - Being Marathi
Navratri – Being Marathi

याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे. शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते, अशी मान्यता आहे.

Navratri - Being Marathi
Navratri – Being Marathi

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे ऋतुबदल होतो, नवरात्रीचा काळ हा ऋतुबदलाचा संधीकाळ मानला जातो. त्यावेळी अनेक रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्य़ा आपली ताकद वाढावी यासाठी सात्विक आहार आणि सोबत देवीची उपासना करणे महत्वाचे मानले जाते. जेणेकरून वातावरणातील बदलाचा दुष्परिणाम होणार नाही. या काळात देवी आदिशक्तीचे वास्तव्य पृथ्वीवर असते अशी एक धारणा आहे. तिच्या उपासनेने सकारात्मक उर्जेचा प्रवेश आपल्या जीवनात होऊन, आपले आयुष्य मंगलमय होईल.

Navratri - Being Marathi
Navratri – Being Marathi