करोडपती शेतकऱ्यांचे गाव हिवरे बाजार

0
2094
Hiware Bazar Grampanchayat - Being Marathi
Hiware Bazar Grampanchayat - Being Marathi

एक असे गाव जिथे अधिकतर शेतकरी आहेत कोट्याधीश महाराष्ट्रातील या गावच्या तरूणांनी बदलला गावाचा चेहरामोहरा !

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा विषय निघाला की डोळ्यासमोर शेतकरी आत्महत्येची प्रतिमा उभी राहते. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे, जिथे ना पाण्याचे संकट आहे ना तिथला शेतकरी गरीब आहे. उलट या गावातील ५० पेक्षा जास्त शेतकरी हे कोट्याधीश आहेत. स्वप्ननगरीसारख्या भासणाऱ्या या गावाचे नाव आहे हिवरे बाजार.

Solar Hiware Bazar - Being Marathi
Solar Hiware Bazar – Being Marathi

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या हिवरे बाजारमध्ये पाऊल ठेवताच असे वाटते की आपल्या स्वप्नातील ‘सुजलाम सुफलाम’ भारत अगदी असाच आहे.

संपूर्ण महाराष्ट्र पाणी संकटाचा सामना करतो आहे. दुष्काळाच्या चक्रामध्ये अडकला आहे. पण हिवरे बाजारमध्ये या समस्यांचा मागमूसही नाही. वर्षानुवर्षे केले गेलेले श्रमदान,गावकऱ्यांची वाखाणण्याजोगी एकता, शून्य राजकारण, सरकारी अनुदानाचा योग्य वापर आणि पाण्याचे नियोजन या साऱ्याच्या मदतीने हिवरे बाजार गावाने महाराष्ट्रासमोर विकासाचे अनन्यसाधारण उदाहरण सादर केले आहे.

कसं आहे हिवरे बाजार?

Popatrao Pawar - Being Marathi
Popatrao Pawar – Being Marathi

हिवरे बाजार हे स्वप्नकथेतल्या गावाप्रमाणे आहे. चारी बाजूंना हिरवळ, स्वच्छ रस्ते आणि पक्की घरे लक्ष वेधून घेतात. अख्ख्या जगाला ग्रासलेल्या मंदीची झळ या गावाला जराही नाही लागली. या गावातून कोणीही नोकरीच्या शोधार्थ बाहेर जात नाही. इथे गावाची संसद असणं हे एखाद्या स्वप्नात किंवा चित्रपटामध्येच आपल्याला दिसतं. पण हिवरे बाजारमध्ये संसद आहे आणि हे सत्य आहे. असे हे आदर्श गाव आहे. ९७७ हेक्टरच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले हे गाव. पाण्याने भरलेले तलाव, शेतामध्ये डोलणारी पिके, गावकऱ्यांचे हसरे चेहरे असे विहंगम दृश्य हिवरे बाजारमध्ये पाहायला मिळते.

Hiware Bazar Road - Being Marathi
Hiware Bazar Road – Being Marathi

पण २० वर्षांपूर्वी हे चित्र असे नव्हते. त्यावेळी ना हिरवळ होती, ना शेतात हिरवीगार पिके. नव्वदच्या दशकात इथली जमीन नापिक बनली होती. लोकांच्या चेहऱ्यावर होती फक्त निराशा. शेतकरी व्यसनाच्या आहारी गेला होता. गावात कोणीही राहायला तयार नव्हते.

hiware bazar - Being Marathi
hiware bazar – Being Marathi

पोपटराव पवार १९८९ साली गावातल्या काही शिक्षीत तरूणांनी हे चित्र बदलायचे ठरवले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, फक्त एकच वर्ष गावचे सगळे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. सुरुवातीला तर त्यांना प्रचंड विरोध झाला, मात्र त्यानंतर तो हळूहळू मावळला. एका वर्षातच याचे चांगले परिणाम दिसू लागले. तरूणांची मेहनत बघून पुढील पाच वर्षांसाठी गावाला तरूणांच्या हाती सोपवण्यात आले. त्याच वर्षी पोपटराव पवार नावाच्या तरुणाला बिनविरोध सरपंच म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गाव जीवतोड मेहनत घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू लागले. त्यानंतर लिहिली जाऊ लागली गावाच्या विकासाची पटकथा…

Popatrao pawar Hiware Bazar - Being Marathi
Popatrao pawar Hiware Bazar – Being Marathi

पोपटराव पवार पुण्याहून एम. कॉम. चा अभ्यास पूर्ण करून गावी परतले होते. १९८९-९० च्या दरम्यान फक्त १२ टक्के शेतजमीन लागवडीखाली होती. गावातल्या विहिरींना फक्त पावसाळ्यातच पाणी असे. त्याशिवाय पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नव्हता. कित्येक कुटुंबे स्थलांतर करू लागली. एवढेच नाही तर सरकारी अधिकारीही गाव सोडून जाऊ लागले.

Watershed - Hiware Bazar
Watershed – Hiware Bazar

१९९० मध्ये गावाचा कायापालट करण्याचे काम सुरू झाले. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण श्रमदान करून जलसंधारणाचे काम सुरू केले. पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा योग्य वापर केला जाई लागला. तीनच वर्षांमध्ये याचा योग्य तो परिणाम दिसू लागला. जलस्तर वाढून विहिरींमध्ये पाणी दिसू लागले. ‘आदर्श गाव योजनेंतर्गत’ हाती घेतलेले पहिले काम जलसंधारणाचेच होते. सरपंच पोपटराव सांगतात की पाण्याची टंचाई दूर झाल्याने शेतीतून पैसा येऊ लागला. डेअरींची संख्या वाढली. फलोत्पादन वाढले. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक व्यक्तिची मिळकत ८५० वरून ३० हजारापर्यंत पोहचली.

Water Balance Sheet_Hiware Bazaar - Being Marathi
Water Balance Sheet_Hiware Bazaar – Being Marathi

आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हिवरे बाजारात पैशांचं नाही तर पाण्याचं ऑडीट होतं. पाणी वाचवण्याची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. अडीच रुपयांत प्रत्येक घरात रोज ५०० लिटर पाणी पोहचवले जाते. आजमितीला गावात ३५० विहिरी आणि १६ बोअरवेल आहेत. गावातील २१६ कुटुंबांपैकी एक चतुर्थांश कुटुंबे कोट्याधीश आहेत. ५० पेक्षा जास्त कुटुंबांची वर्षाची मिळकत १० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या गावाचे महिन्याचे दरडोई उत्पन्न देशातील इतर गावातील दरडोई उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. हिवरे बाजारचा आदर्श इतर गावांनी घेतला तर महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त होईल.

Being Marathi