धोकादायक खेळांच्या 50 व्या टास्क मध्ये आत्महत्या करतात खेळाडू !

0
1020

कल्पनाशक्तीला मिळालेले विध्वंसकारी रूप – ब्लू व्हेल

मुंबईतील एका १४ वर्षांच्या मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि चर्चेत आला ‘ब्लू व्हेल’ नावाचा विध्वंसकारी खेळ. इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम म्हणा किंवा त्याचा अतिरेक म्हणा. पण हा खेळ जीवघेणा ठरतो आहे एवढे मात्र नक्की.

या गेमचे कुळ आणि मूळ शोधायला गेलं तर आपण पोहचतो थेट रशियात. जिथे २०१३ साली फिलीप बुडेकिन नावाच्या २५ वर्षीय युवकाने आपल्यातल्या कल्पनाशक्तीला असे विध्वंसकारी रूप दिले. त्याने या खेळाची निर्मिती केली. एकट्या रशियात जवळपास १३० किशोरवयीन मुलांचे बळी या खेळाने घेतले. २०१५ साली या गेममुळे झालेली एक आत्महत्येची केस समोर आली आणि त्यानंतर बुडेकिनची रवानगी तुरूंगात झाली. पण तोपर्यंत याचे जाळे बऱ्याच देशामध्ये पसरले होते. आजघडीला भारत-पाकिस्तान, अमेरिकेसह १९ देशांतले २०० हून अधिक बळी या गेमने घेतलेत. इतके विक्राळ स्वरूप या मायावी राक्षसाने धारण केले आहे.

इंटरनेटच्या मदतीने खेळल्या जाणाऱ्या या खेळात ५० टास्क दिले जातात. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर धारदार वस्तूने हातावर एक कट मारायला सांगितले जाते. हे कट अशा पद्धतीचे असतात की शेवटी हातावर ‘व्हेल’ माशाची आकृती तयार होते. हातावर ब्लेडने एफ-५७ असे कोरून त्याचा फोटो काढून पाठवायला सांगितले जाते. पहाटे ४.३० ला उठून हॉरर फिल्म पाहा, व्यवस्थापकाने पाठवलेले संगीत ऐका, एखाद्या पुलावर किंवा खूप उंच छतावर उभे राहा अशा अनेक गोष्टी या ५० दिवसांत करायला सांगितल्या जातात. व्यवस्थापकाकडून ऐकवल्या जाणाऱ्या संगितामध्ये नार्वेचा प्रसिद्ध गायक ‘एमिली निकोलस’ याच्या आवाजातील एका प्रेरणादायी (Motivational) गाण्याचाही समावेश आहे. जे स्कॉटलंड येथे चित्रीत करण्यात आले होते. सगळ्यात शेवटी उंचावरून उडी मारून आत्महत्या करायला सांगितली जाते. नुसता विचार करूनही अंगावर भीतीने शहारा यावा, इतका अमानुष खेळ मुले कोणत्या संमोहनाखाली खेळत असतील?

मार्च २०१७ मध्ये रोमानियन मंत्री कारमेन दान यांनी या खेळाविषयी चिंता व्यक्त केली होती. ब्लू व्हेल नामक समस्या फ्रान्स, युनायटेड किंग्डम, पश्चिम युरोप यासारख्या देशांमध्ये चिंतेचा विषय बनली आहे. भारतीय भारतात या गेमचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचे आदेश इंटरनेट कंपन्यांना दिले गेलेत. तरीही जर या गेमच्या लिंक हटवल्या गेल्या नाहीत तर कठोर कारवाईचे आदेशही सरकारने दिले आहेत.

हे सगळं इतकं अविश्वसनीय आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. कमालीची कल्पनाशक्ती वापरून तयार केलेल्या एखाद्या चित्रपटातही असं घडणं अशक्य आहे. पण हे सारं सत्यात घडतं आहे. जिंकण्याची इर्ष्या, त्यासाठी कोणतंही अचाट साहस करण्याची मानसिकता यातून व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, हे भयावह सत्य आपल्यासमोर या गेममुळे आलं आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप यासारख्या वस्तूंनी तुम्ही जगाशी जोडले जाता. ज्ञानाचे भांडार तुमच्यासमोर खुले होते. हे मानवी विकासाला पोषक आहे. पण या मार्गाने मृत्युचं तांडवही खेळता येतं यावर कसा विश्वास ठेवावा? पण हे अतिदाहक सत्य आहे. शहाणी आणि सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी त्यांच्यात विवेक आणि समजूतदारपणाची बीजे पेरावी लागतात. हाच संदेश या अमानवी खेळाच्या निमित्ताने सर्व पालकांमध्ये जाणे आता अनिवार्य ठरते आहे.