जेजुरीचा खंडोबा…खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप..

0
2811

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे.

धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात पुणे- बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे. जेजुरीला खंडोबाचे मंदिर एका उंच टेकडीवर असून जवळपास दोनशे पायर्‍या चढून मंदिरात जावे लागते. टेकडीवरून संपूर्ण जेजुरीचा विलोभनीय देखावा पाहून प्रवासातील शीण क्षणात नाहीसा होऊन जातो.

मंदिराच्या पायथ्याशी प्राचीन दीपमाळ आहे. त्या प्रज्वलित झाल्यानंतर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात खंडोबाचे मंदिर उजळून निघते. खंडोबाचे मंदिर दोन भागात आहे. पहिल्या भागात मंडप तर दुसर्‍या भागात गर्भगृह आहे. मंडपात भाविक सामूहिक पूजाअर्चा करतात. गर्भगृहात खंडोबाची चित्ताकर्षक मूर्ती विराजमान आहे. खंडोबाचे मंदिर हेमाडपंथी असून मंदिरात 10X12 फुट आकाराचे पितळी कासव आहे.

मंदिर परिसरात ऐतिहासिक शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विजयादशमीला येथील तलवार अधिक वेळ उचलण्याची स्पर्धा घेतली‍ जाते. येथील ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा.

कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत.

या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते धनगर कन्या बानुशी विवाह केल्यामुळे व तिच्यावरील प्रेमासाठी देवाने मेंढ्यांची राखण करण्याचे काम केल्याने धनगर समाज प्रामुख्याने या दैवतास मानतात परंतु खंडोबा हे फक्त धनगर समाजाचे नव्हे तर महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते… येथील खंडा तलवार आणि मर्दानी दसरा प्रसिद्ध आहे.. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनास येतात.

 

येळकोट येळकोट जय मल्हार!!