नाविन्याच्य़ा ध्यासातून झाली Amazon.com ची स्थापना

0
2741

नाविन्याच्य़ा ध्यासातून झाली Amazon.com ची स्थापना. जेफ बेझोस यांची अभूतपूर्व कहाणी.

आज आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन खरेदीसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याबद्दल. अॅमेझॉनची स्थापना करून त्यांनी खरेदीच्या संकल्पनाच बदलून टाकल्या. तुम्हाला जे काही हवंय ते एका क्लिकसरशी तुमच्या दरवाजात येऊन उभं राहतं. तेही बाजारातील किंमतीपेक्षा कमी दरात.

Amazon (5) - Being Marathi
Amazon (5) – Being Marathi

लोकांचे जीवन सोपे करणारी ही खरेदीची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे जेफ बेझोस यांचा जन्म एका अल्पवयीन मातेच्या उदरातून झाला. फक्त १८ महिन्यांचे असताना त्यांचे वडील त्यांना आणि त्यांच्या आईला वाऱ्यावर सोडून निघून गेले. जेफ बेझोस आपल्या आईचे वडील आणि त्यानंतर सावत्र वडिलांच्या छत्रछायेत वाढले. नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहिले. एका वळणावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ऑनलाईन व्यवसायात त्यांनी उडी घेतली.

Amazon (1) - Being Marathi
Amazon (1) – Being Marathi

स्वतःच्या गॅरेजमधून अॅमेझॉनची स्थापना करून जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक बनले.
Amazon.com आजघडीला अमेरिकेतीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे.

जेफ बेझोस

जन्म – १२ जानेवारी १९६४,

जन्म ठिकाण – अल्बुकर्क, न्यू मेक्सिको, यु.एस.

नागरिकत्व – अमेरिकन

कार्यक्षेत्र – तंत्रज्ञान आंत्रप्रिन्युअर, गुंतवणूकदार (Technology Entrepreneur And Investor )

व्यवसाय – संस्थापक, सी.ई.ओ. Amazon.com

१९९४ : amazon.com नामक company ची स्थापना. A या अक्षराने कंपनीचे नाव ठेवले कारण| internet search alphabetical order मध्ये हे नाव लवकर यावे.

१९९५: Amazon.com website सुरू झाली.

१९९७: Amazon कंपनी IPO stock market च्या यादीत आली.

१९९९: First international website सुरू झाली.

२००१: कंपनीला पहिल्यांदा नफा झाला.

२००७: Amazon किंडल नामक e-book reader बाजारात आले.

२०११ : टेबलेट कम्प्युटरच्या क्षेत्रात प्रवेश.

आयुष्याकडून जेफ बेझोस यांना जे जे शिकायला मिळाले तेच त्यांच्या यशाचे मंत्र ठरले. यशस्वी होण्यासाठी आचरणात आणणे गरजेचे आहेत, असे काही मौलिक विचार प्रसिद्ध करतो आहोत.

Jeff Bezos (4) - Being MARATHI
Jeff Bezos (4) – Being MARATHI

दूरदृष्टीने विचार करा – जर तुम्ही दूरदृष्टीने विचार केलात तर चांगले निर्णय घेऊ शकता. ज्या निर्णयांबद्दल तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. बेझोस यांनी नेहमी ‘शून्य पश्चाताप’ या नीतीचेच पालन केले आहे. कोणताही नवीन निर्णय घेण्यापूर्वी ते दूरदृष्टीने विचार करतात. जास्त काळार्यंत नफा कसा होईल हाच विचार करून ते निर्णयाची अंमलबजावणी करतात. भलेही तसे करताना तत्कालिक नुकसान झाले तरी चालेल.

Jeff Bezos (4) - Being MARATHI
Jeff Bezos (4) – Being MARATHI

नोकरी सोडून अॅमेझॉन ची स्थापना करतानाही त्यांनी ‘शून्य पश्चाताप’ च्या धर्तीवरच निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की वयाच्या ८० व्या वर्षी नोकरी सोडल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही. पण जर ऑनलाईन व्यवसायाच्या सुवर्णसंधीचा लाभ नाही घेतला तर मात्र एक ना एक दिवस नक्कीच पश्चातापाची वेळ येईल. त्यांच्या मते अपयशी झालो तर कधीच पस्तावणार नाही पण प्रयत्न न करण्याचा पश्चाताप त्याहीपेक्षा मोठा असेल. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केले आणि ते यशाच्या शिखरावर पोहचले.

नाविन्याचा ध्यास घ्या – नवीन काम करणे यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बेझोस यांनी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीची नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली. यापूर्वी अशा पद्धतीने पुस्तके विकली जात नव्हती. या ऑनलाईन पुस्तक विक्रीनंतरही ते नवनवीन कल्पना मूर्त स्वरूपात आणतच राहिले. स्वतःची वेबसाईट Amazon.com वर त्यांनी अनेक नवीन गोष्टी सुरू केल्या. जसे की वन क्लिक शॉपिंग, ग्राहक समिक्षा, ईमेल ऑर्डर, व्हेरीफिकेशन इत्यादि. बेझोस यांच्या मते ‘विकास न करणे ही सर्वात भयावह बाब आहे.’ त्यांनी सतत नाविन्याचा ध्यास घेऊन विकास साधला. इतकेच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांनाही ते नवनवीन कामांसाठी प्रोत्साहित करत असतात. काही कामे यशस्वी होतात तर काही कामांमध्ये अपयशही येते. जसे की १९९९ मध्ये Amazon Auction च्या माध्यमातून लिलाव करण्याची संकल्पना पूर्णतः अपयशी ठरली पण ‘किंडल रिडर’ च्या माध्यमातून पुस्तके वाचण्याची संकल्पना इतकी यशस्वी ठरली की, ‘किंडल’ने वाचन क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणली. बेझोस म्हणतात, ‘आपण अनेक काळोख्या मार्गावरून चालत असतो आणि कधीतरी अशी एखादी गोष्ट शोधतो जी खरंच कामाची असते.’

कमीत कमी नफ्याचा विचार करा – १० रूपयांची वस्तू जर आपण ११ रुपयांना विकली तर नफा कमी होतो. तीच वस्तू जर १५ रूपयांना विकली तर तर नफा जास्त होतो. पण जास्तीत जास्त यशस्वी कंपन्या ‘कमी नफा आणि जास्त सेवा’ या तत्वावर चालतात. अॅमेझॉनही याच तत्वावर चालते. जेफ बेझोस यांचे म्हणणे आहे की, जास्त नफ्यामुळे माणूस आळशी होतो. कमी नफा मिळाला तर यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. कार्यकुशल बनावे लागते. अॅमेझॉन नेहमी कार्यकुशलतेवर भर देते. जेणेकरून ग्राहकांना कमीत कमी किंमतीत सामान उपलब्ध होऊ शकते. ‘कमी नफा’ तत्वामुळेच अॅमेझॉनने आजर्यंत एवढी मोठी मजल मारली आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या काळातच बेझोस यांनी भविष्य वर्तवले होते की, ‘पाच वर्षांपर्यंत कंपनीला कोणताही फायदा होणार नाही.’ आणि झालेही तसेच. कंपनीला पहिला फायदा झाला तो २००१ साली. याबाबत आपले मत व्यक्त करताना बेझोस म्हणतात, ‘आम्ही फायद्यामध्ये आहोत की नाही ही आमच्या ग्राहकांची समस्या नाही. आमच्या अकार्यक्षमतेसाठी आम्ही आमच्या ग्राहकाचा खिसा कापणार नाही.’

ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रीत करा – तसे पाहिले तर प्रत्येक व्यवसायामध्ये असे म्हटले जाते की ‘ग्राहक राजा असतो.’ पण वस्तुस्थिती मात्र नेमकी याच्या उलट असते. अॅमेझॉनने मात्र ग्राहकांचे समाधान सर्वोपरी मानले आहे. बेझोस यांच्या मानण्यानुसार ग्राहकापेक्षा जास्त महत्वाचे काही नाही. म्हणून तर कंपनी ‘कमी नफा’ तत्वावर चालते. जास्त नफा कमावण्याचा मोह ग्राहकांना असमाधानी बनवतो. बेझोस यांच्या दृष्टीने, मागील काही वर्षांमध्ये जर इतर कंपन्यांच्या तुलनेने अॅमेझॉनने जास्त चांगली कामगिरी करून दाखवली असेल तर त्यामागचं महत्वपूर्ण कारण हे आहे की, आम्ही ‘ग्राहकांचे समाधान’ महत्वाचे मानले. अॅमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या सामानाची संख्याही याचसाठी वाढविली गेली की ज्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देता यावी. अॅमेझॉनच्या ‘Amazon E-commerce’ वर ग्राहकांना प्रत्येक वस्तू ऑनलाईन मिळावी असा कंपनीचा कयास आहे.

मौखिक प्रचारावर (Mouth Publicity) भर द्या – बेझोस यांनी जेव्हा अॅमेझॉन सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे मार्केटींगसाठी बजेटच नव्हते. त्यामुळे कुठे जाहिरात करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमोर आपल्या कंपनीची स्तुती करणं हा जाहिरातीचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग बेझोस यांच्यासमोर होता आणि त्यांनी तोच वापरला. त्यांना हे पुरेपुर माहीत होतं, की त्यांची कंपनी ग्राहकांच्या मौखिक प्रचारामुळेच (Mouth Publicity) चालू शकते. त्यांच्या मते जर तुम्ही तुमच्या एका ग्राहकाला पुरेपूर समाधान दिले तर तो दुसऱ्या अनेक ग्राहकांकडे तुमच्या कंपनीची भरभरून स्तुती करतो. मौखिक प्रचार खूप प्रभावी असतो. त्यामुळेच बेझोस यांनी आपली सर्व उत्पादने आणि सेवा इतक्या उत्कृष्ट बनवल्या आहेत की ग्राहकांनी त्याची Mouth Publicity केलीच पाहिजे.
जेफ बेझोस यांचा जीवनप्रवास

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिंमध्ये सामील असणाऱ्या जेफ बेझोस यांच्या ‘Amazon’ कंपनीच्या यशाचा मंत्र काय? असे वेगळे काय केले त्यांनी ज्यामुळे ‘Amazon’ जगातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी बनली? ‘Amazon’ ला त्यांनी इंटरनेट सेल्स मॉडेलच्या स्वरूपात कसे काय विकसित केले? ३ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या कंपनीमध्ये आज जवळपास २०,००० कर्मचारी काम करतात. बेझोस यांच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या प्रवासाकडे नजर टाकावी लागेल.

बालपण – असे म्हणतात, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’. ही म्हण बेझोस यांना पूर्णपणे लागू होते. लहानपणी स्क्रू ड्रायव्हर घेऊन स्वतःचा पाळणा खोलायचा प्रयत्न करीत असत. थोडे मोठे झाल्यावर विजेच्या उपकरणांमध्ये ते रस घेऊ लागले. त्यांचा भाऊ कल्पना न देता त्यांच्या खोलीत शिरू नये, यासाठी त्यांनी एक इलेक्ट्रीक अलार्म बनवला. बेझोस चौथीत असताना त्यांच्या शाळेत ‘मेनफ्रेम कम्प्युटर’ आला होता. ही संधी हातची घालवतील तर ते जेफ बेझोस कसले? खरं तर त्यावेळी शाळेतल्या शिक्षकांना कम्प्युटर चालवता येत नव्हता. त्यामुळे बेझोस आणि त्यांचे मित्र माहिती पुस्तिका (Manual) वाचून कम्प्युटर चालवायला शिकले. त्यावेळी हे कोणाच्या ध्यानीही नसेल की, बेझोस कम्प्युटर विश्वात ऑनलाईन क्रांती घडवून आणणार आहेत.

कंपनीची स्थापना व त्य़ामागचा विचार – कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असलेले बेझोस न्यूय़ॉर्कमध्ये फंड मॅनेजर म्हणून नोकरी करीत होते. १९९४ सालच्या एप्रिल महिन्यात नेट सर्फींग करताना त्याना कळले की वेबचा उपयोग करणाऱ्य़ांची संख्या दरवर्षी २३०० च्या दराने वाढते आहे. पापणी लवता न लवता त्यांच्या मनात ऑनलाईन बिझनेसची संकल्पना त्यांना सुचली. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नवीन नवीन लग्न झालेले असातनाही त्यांनी ही जोखीम स्वीकारली. ऑनलाईन काय विकावे यावर खूप विचार केल्यानंतर त्यांना पुस्तके हा पर्याय सुचला.

बेझोस यांनी १९९४ साली कंपनीचा स्थापना केली आणि १९९५ साली ती चालवायला सुरूवात केली. बेझोस यांनी सुरुवातीला कंपनीचे नाव ‘केडेब्रा डॉट कॉम’ ठेवले. परंतु तीन महिन्यांनी स्वतःच त्यांनी कंपनीचे नाव बदलून ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ ठेवले. जगातील सर्वात मोठी नदी आहे अॅमेझॉन. बेझोस यांना आपली कंपनी त्या नदीप्रमाणेच मोठी होत जावी, असे वाटत होते. त्यांची वेबसाईट बुकस्टोरच्या रूपात सुरू झाली. नंतर या साईटवर डीव्हीडी, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे इत्यादि गोष्टीही विकल्या जाऊ लागल्या. अॅमेझॉन कंपनीची सुरूवात एका गॅरेजमधून झाली होती. तीही फक्त तीन कम्प्युटरच्या साहाय्याने. ऑनलाईन विक्री सॉफ्टवेअर बेझोस यांनी स्वतः तायर केले होते. तीन लाख डॉलर्सची गुंतवणूक त्यांच्या आई-वडिलांनी केली होती. कंपनीच्या स्थापनेच्या सुरूवातीलाच त्यांच्या वडिलांचा पहिला प्रश्न होता – ‘इंटरनेट म्हणजे काय’? कंपनी सुरू झाल्यानंतर काही काळाने त्यांची आई म्हणाली ‘आम्ही इंटरनेटवर पैसे नाहीच लावले, पैसे तर आम्ही तर जेफवर लावले’. मात्यापित्याचा हा विश्वास शंभर टक्के खरा ठरला. अॅमेझॉनच्या ६ टक्क्यांचे भागधारक (Share Holder)असल्याने २००० साली जेव्हा कंपनी नफा कमावू लागली तेव्हा ते दोघेही अरबपती बनले.

संघर्षाचा काळ – १६ जुलै १९९५ ला बेझोस यांनी आपल्या वेबसाईटवर पुस्तके विकण्यास सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात अॅमेझॉन ने अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये आणि अन्य ४५ देशांमध्ये पुस्तके विकली गेली. हे काम नक्कीच सोपे नव्हते. जमिनीवर बसून पुस्तके पॅक करावी लागत आणि पार्सल घरी देण्यासाठी स्वतः जावे लागे. बेझोस यांची मेहनत अखेर कामी आली आणि सप्टेंबरमध्ये २०,००० डॉलरची विक्री होऊ लागली.

नेट बँकींग (Net Banking) च्या युगाचा प्रारंभ – बेझोस यांनी amazon.com website सुरू करून नवीन इतिहास रचला. इंटरनेटच्या माध्यमातून पाहिजे ती पुस्तके खरेदी करण्याची सुविधा लोकांना मिळाली. इंटरनेट क्रांतीची सुरुवात करत त्यांनी Online Selling and Net Banking चे सुरू केले. प्रचंट मेहनतीच्या जोरावर त्यांनी अॅमेझॉन हा असा ब्रँड बनवला ज्याची कमाई २०१४ साली अमेरिकन डॉलरमध्ये ८८. ९८८ इतकी होती. जुलै २०१५ सालच्या आकडेवारीनुसार जगभरात या कंपनीचे सुमारे १,८३,१०० कर्मचारी काम करतात.

महत्वपूर्ण वळण – २००७ पर्यंत अॅमेझॉन डॉट कॉम हा ऑनलाईन विक्रीचा मोठा ब्रँड बनला होता. पण नोव्हेबर २००७ मध्ये कंपनीच्या इतिहासात एक वेगळे वळण आले. कंपनीने ‘अॅमेझॉन किंडल’ नावाचे ‘ई-बुक रीडर’ बाजारात आणले आणि कंपनीला ‘न भूतो न भविष्यती’ असा फायदा झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये वाचकांना हवी ती पुस्तके वाचण्यास मिळू लागली. निव्वळ सहा तासांमध्ये किंडलचा सारा स्टॉक संपला. पुढील पाच महिने असेच सुरू राहिले. किंडलमुळे अॅमेझॉनने अमेरिकेच्या ९५ टक्के ई-बुक व्यवसायावर ताबा मिळवला.
अतुलनीय कल्पनाशक्ती आणि अभ्यासू वृत्तीमुळे जेफ बेझोस यशाच्या शिखरावर पोहचले.