नामांकित आयटी कंपनीतील जॉब सोडून या महिलेने सुरु केले हॉटेल

0
1097
Jayanti
Jayanti

नामांकित आयटी कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दाक्षिणात्य राज्यात, नऊवारी साडी नेसून कोणी मराठमोळे उपाहारगृह चालववण्याचे स्वप्न पाहिले तर त्या व्यक्तिची गणना नक्कीच वेड्यात करू आपण. पण याच वेडाने झपाटून जाऊन आपले स्वप्न ‘पूर्णब्रम्ह’च्या रूपाने सत्यात उतरवले आहे, जयंती कठाळे यांनी.

Jayanti
Jayanti

मूळच्या नागपूरच्या असलेल्या जयंती कठाळे या आयटी क्षेत्रात कार्यरत होत्या. नोकरीनिमित्त त्या बंगळूरूमध्ये स्थायिक झाल्या. अमराठी शहरात मराठमोळ्या जेवणाच्या ओढीने त्या बेचैन होत असत. बेचैनीच्या या आगीत ठिणगी पडली ती एका विमानप्रवासात. 27 तासांचा विमानप्रवास शाकाहारी जेवणाअभावी निव्वळ ब्रेडबटर खाऊन करावा लागला. तेथेच त्यांच्या मनात ‘पूर्णब्रम्ह’ या उपाहारगृहाचा जन्म झाला.

भरपूर पगार असलेली नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ खाद्यव्यवसायात उतरायचे ठरवले. सुरूवातीला दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केलेले छोटेसे रेस्टॉरंट आज बंगळुरूमधील एचएसआर या उच्चभ्रू भागात 5700 चौरस फुटांच्या जागेत विस्तारले आहे.
हे यश सहजासहजी मिळालेले नाही. पूर्णब्रम्ह सुरू करण्यापूर्वी जयंती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा महिने महिने बंगळुरूतील छोट्या-मोठ्या प्रत्येक उपहारगृहात जाऊन तिथल्या परिस्थितीचा, पदार्थांचा, सेवेचा, दराचा, गुणवत्तेचा बारकाईने अभ्यास केला. पदार्थांची गरज लक्षात घेतली. महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांत जाऊन तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची चव चाखली. जयंती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खाद्यव्यवसायाच्या क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळेच प्रत्येक गोष्टीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीने मार्केटींग करावे लागेल या साऱ्याचा आकृतीबंध तयार करून मग कामाला सुरूवात केली. या साऱ्या कंबरतोड मेहनतीचे फलित म्हणून ‘पूर्णब्रम्ह’ आज दिमाखात यशाच्या दिशेने पावले टाकते आहे.

जयंती कठाळे
जयंती कठाळे

‘पूर्णब्रम्ह’मध्ये जेवण बनवणारी सर्व मंडळी अमराठी. अशा परिस्थितीत दाक्षिणात्य भाषेचे कोणतेही ज्ञान नसताना मराठी पदार्थ कसे तयार करावे, हे जयंती यांनी या लोकांना निव्वळ हातवारे करून शिकवले. इतकेच काय तर मराठी पद्धतीचा पदार्थ कसा खावा, याचेही मार्गदर्शन त्यांना करावे लागले. इतर अनेक हॉटेल्समध्ये असतात तशी खुर्च्या टेबले ‘पूर्णब्रम्ह’मध्ये नाहीत तर चौरंगपाटाच्या पंगती बसतात. एका वेळी 200 माणसांची पंगत जेवायला बसते. या सर्वांमध्ये उठून दिसणारा असतो तो जयंती कठाळे यांचा नऊवारी साडीतला मराठमोळा वावर. ‘पूर्णब्रम्ह’मध्ये जेवण वाया घालविण्यास अजिबात परवानगी नाही. अन्न शिल्लक ठेवले तर बिलापेक्षा 2 टक्के रक्कम अधिक भरावी लागते आणि पूर्ण जेवण संपवले तर 5 टक्के सूट दिली जाते.
`पूर्णब्रह्म’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे महिलांना प्राधान्य दिले जाते. कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला आहेत. पगाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्या पगारात भेदभाव केला जात नाही. फ्रँचायझी देतानाही महिलांना प्राधान्य दिले जाते. जयंती कठाळे त्यांच्या मते, `प्रत्येक महिलेच्या स्वयंपाक कलेला ह्या निमित्ताने मोठे व्यासपीठ आणि त्यातून उत्पन्न मिळवून देणे, हे पूर्णब्रह्मचे उद्दिष्ट आहे!’

जयंती कठाळे
जयंती कठाळे

जयंती कठाळे यांच्या या उपक्रमाचे इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनीही मनमोकळेपणाने कौतुक केले. पुण्यात आणि बंगळुरू येथील इन्फोसिसमध्ये पूर्णब्रह्मच्या शाखा सुरू करण्यासही त्यांनी परवानगी दिली. मुंबईत अंधेरी येथेही पूर्णब्रह्मची शाखा सुरू झाली आहे. फिलाडेल्फिया आणि शिकागो येथे शाखा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तसेच मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.

Jayanti
Jayanti

‘भारतात ‘पूर्णब्रम्ह’ च्या 5000 शाखा तरी सुरू करून दाखवीनच.’ या ध्येयाने झापटलेल्या जयंती कठाळे यांच्या जिद्दीला सलाम आणि यशासाठी शुभेच्छा.

Comments

comments