राणी पद्मावती – सत्य की काल्पनिकता ?

0
3533

राणी पद्मावती – सत्य की काल्पनिकता ?

चितोडची राणी पद्मिनी किंवा पद्मावती हे भारताच्या इतिहासातील एक अजरामर नाव. इतकी शतके लोटूनही तिच्या बलिदानाची गौरवगाथा लोकांच्या स्मरणात आहे. साधारण १३ व्या किंवा १४ व्या शतकात राजस्थानातील मेवाडची राजगादी सांभाळणारे राजा रावल रतनसिंह यांची धर्मपत्नी, जिने शीलरक्षणासाठी स्वतःला अग्निकुंडामध्ये झोकून दिले. राजस्थानच्या भाषेत याला ‘जौहार’ म्हणतात.

सिंहलद्वीप (श्रीलंका) चा राजा गंधर्वसेन व राणी चंपावती यांच्या पोटी जन्मलेली ही पद्मावती. अत्यंत सुंदर, रुपवती कन्या. राजस्थानमधील राजा रावल रत्नसिंह यांच्यासोबत पद्मावतीचे लग्न झाले. पद्मावतीवर रत्नसिंह यांचे इतके प्रेम जडले की त्यानंतर त्यांनी कधीही लग्न केले नाही. खासकरून त्या काळात वंशवृद्धी आणि राज्यविस्तारासाठी अनेक लग्ने केली जात असत आणि ती समाजमान्य असत. तरीही पद्मावतीशी झालेल्या विवाहानंतर रत्नसिंह यांनी पुन्हा विवाह केला नाही. पण त्यापूर्वी त्यांचे अनेक विवाह झाले होते.

राणी पद्मावतीच्या सौंदर्याची चर्चा देशोदेशी होती. अशात दिल्लीवर हुकुमत गाजवत असलेला सुलतना अलाउदीन खिलजी याच्या कानावर पद्मावतीच्या सौंदर्याची वार्ता आली. तिचे राजस सौंदर्य पाहण्याची त्याची अनिवार इच्छा झाली. त्याने रत्नसिंह यांच्याकडे तशी मागणी केली. तेव्हा राजा रत्नसिंह यांनी पद्मावतीचे आरशातील प्रतिबिंब खिलजीला दाखवले. ते पाहिल्यानंतर वासनांध झालेल्या अलाउदिन खिलजीने चितोडवर स्वारी केली. त्या युद्धात राजा रावल रत्नसिंह यांचा मृत्यू झाला. राजपूत सैन्याचा पराभव झाला. ही वार्ता कानी येताच राणी पद्मावती आणि महालातील अन्य स्त्रियांनी आपल्या अब्रूरक्षणासाठी अग्निकुंडात आत्मसमर्पण (जौहार) केले. स्त्रियांनी जौहार केल्याचे समजताच उरलेले राजपूत सैन्य त्वेषाने लढले. त्या लढाईत सर्व सैन्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या बलिदानाने राणी पद्मावती आणि राजा रावल रत्नसिंह यांचे नाव इतिहासामध्ये अमर झाले.

ही आख्यायिका शतकानुशतके अनेक कवी, धर्मप्रचारक, लोकगायक, भाट यांच्याकडून वेगवेगऴ्या रुपात आणि आशयांमध्ये लोकांसमोर येत राहिली. परंतु राणी पद्मावती किंवा पद्मिनी या नावाची राणी होती की नाही याबाबतीत काहीच ऐतिहासिक पुरावा नाही. राणी पद्मावती व राजा रत्नसिंह यांचा १३०३ च्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर १५४० मध्ये कवी मलिक मोहम्मद जायसी याने अवधी भाषेमध्ये ‘पद्मावत’ या काव्याची अथवा ग्रंथाची रचना केली. त्यात

बोलहु सुआ पियारे नाहाँ| मोरे रुप कोइ जग माहाँ ?
सुमिरि रूप पद्मावती केरा| हँसा सुआ, रानी मुख हेरा||

या ओळींमध्ये सर्वप्रथम पद्मावतीचा उल्लेख सापडतो. या ग्रंथाच्या नावावरून किंवा या काव्यातील ओळींमध्ये असलेल्या पद्मावती या नावावरून हे पात्र निर्माण झाले असावे की काय ? असा प्रश्न पडतो.

चितोडवरील स्वारीच्या वेळेला अलाउदिन खिलजीसोबत असलेला इतिहासलेखक अमीर खुसरो याच्या लेखनामध्ये राणी पद्ममावतीविषयी तसा थेट उल्लेख सापडत नाही. त्याशिवाय पारसी इतिहासलेखकांनीही यासंबंधी काहीही लिहिलेले नाही. फक्त फरीश्ता नावाच्या लेखकाने १६१० मध्ये हा सगळा वृत्तांत लिहीला आहे. जो सध्या प्रचलित आहे. पण त्यात तेवढी विश्वसनीयता नाही. कारण त्याने मोहम्मद जायसी च्या ‘पद्मावत’ वरून त्याचे लिखाण केले आहे. मुळात ‘पद्मावत’ हे रत्नसिंह व पद्मावती यांच्या मृत्युनंतर जवळपास २४० वर्षांनी लिहीलं गेलं आहे.

इतिहासकार ओझा यांच्या मतानुसार पद्मावत, फरीश्ता, इतिहासकार टाड यांच्या लेखनाचा विचार केल्यास फक्त एकाच बाबतीत तथ्य आढळते… ते म्हणजे चितोडच्या किल्ल्यावर केलेल्या चढाईच्या वेळी झालेल्या युद्धात राजा रावल रत्नसिंह मारले गेले आणि त्यांची राणी पद्मावती किंवा पद्मिनी हिने अन्य राजूत रमणींसह जौहार केला. या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहेत.

इतिहासकार ओझा यांनी राजा रत्नसिंह यांच्या संदर्भात कुंभलगढ येथील एक प्रशस्तिलेख प्रसिद्ध केला आहे. ज्यात मेवाडचा स्वामी म्हणजेच राजा आणि समरसिंह यांचा पुत्र असा त्यांचा उल्लेख आहे. परंतु हा लेखही रत्नसिंह यांच्या मृत्युच्या (१३०३) पश्चात १५७ वर्षे म्हणजे १४६० मध्ये सापडला होता. प्रख्यात इतिहासकार तेजपाल धामा सिंह यांनी ऐतिहासिक संदर्भ तसेच जाफना मधून प्रकाशित ग्रंथांच्या आधारे पद्मिनी ही श्रीलंकेची राजकुमारी होती, हे सिद्ध केले आहे. परंतु राजा रत्नसिंह यांच्या एका पत्नीचे नाव पद्मावती किंवा पद्मिनी असावे हे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. आपल्या शीलरक्षणासाठी स्त्रिया काय करू शकतात हे दाखवण्यासाठी अथवा ‘पद्मिनी महाल’ किंवा ‘पद्मिनी तलाव’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांवरून कोणा अज्ञात राणीला पद्मावतीचे नाव देणे तसे सुसंगत नाही. त्याचा प्रतिकात्मक किंवा काल्पनिक पात्र म्हणून विचार करणेच योग्य आहे. परंतु या नावाची मोहिनी लोकांवर इतकी आहे की या सगळ्यामागचे सत्य जाणून घेण्याची समाजाची इच्छा नाही किंवा सत्य जाणून घेऊन आपल्या आदर्श राणीच्या प्रतिमेला धक्का लावणे त्यांच्या मनाला पटत नाही.