अल्लाउद्दिन खिलजी

0
2897

अल्लाउद्दिन खिलजी

दिल्लीवर शासन करणाऱ्या क्रूर शासनकर्त्यांमध्ये अल्लाउद्दिन खिलजी हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सध्या अल्लाउद्दिन खिलजी चर्चेत आहे तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमामुळे. कोण होता हा अल्लाउद्दिन खिलजी? जाणून घेऊया त्याचा इतिहास
अल्लाउद्दिन खिलजीचे खरे नाव अली गुरशास्प. दिल्लीवर हुकुमत गाजवणाऱ्या खिलजी वंशाचा दुसरा शासक. त्यापूर्वी त्याचा सख्खा चुलता जलालुद्दिन खिलजी हा दिल्लीच्या तख्तावर विराजमान होता. अल्लाउद्दिन खिलजीच्या काळात त्याचे साम्राज्य दिल्ली ते दक्षिणेकडे मदुराईपर्यंत पसरले होते. त्यानंतर ३०० वर्षे इतके मोठे साम्राज्य कोणीही प्रस्थापित करू शकला नाही.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

अल्लाउद्दिन खिलजीचा चुलता जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर अल्लाउद्दिनला ‘अमीर ए तुजुक’ हे पद मिळाले. मलिक छज्जू याचे बंड मोडून काढल्यामुळे जलालुद्दिनने खुश होऊन त्याला कडा-मणिकपूरचे सुभेदारी दिली. भिलसा, चंदेरी, देवगिरीवरील स्वाऱ्यांमुळे त्याला अपार संपत्ती मिळाली. त्यामुळे त्याच्या साम्राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली. जलालुद्दिन खिलजी याचा घातपाताने मृत्यू घडवून आणून अल्लाउद्दिन खिलजीने स्वतःला दिल्लीचा सुलतान घोषित केले. दिल्लीतील बलबनमधील लाल महाल येथे १२ ऑक्टोबर १२९६ ला स्वतःचा राज्याभिषेक करवला.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

तसे त्याचे शिक्षण फारसे झाले नसले तरी युद्धकला आणि सैनिकी प्रशिक्षण त्याला चांगले अवगत होते. तो एक अत्यंत महत्वकांक्षी योद्धा होता. अल्लाउद्दिन खिलजी स्वतःला ‘दुसरा अलेक्झांडर’ म्हणवून घेत असे. जलालुद्दिन खिलजीला ठार करून सुलतान झाल्यानंतर त्याला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. पण हा विरोध त्याने कौशल्याने मोडून काढला. १२९६ ते १३०८ च्या काळात वारंवार मंगोल शासकांची आक्रमणे होत राहिली. पण ती आक्रमणे खिलजीने परतवून लावली. काही मंगोल वंशीय दिल्लीच्या आसपास स्थायिक झाले. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यांना नवीन मुसलमान म्हटले जात असे. मात्र, खिलजीचा त्यांच्यावर जराही विश्वास नव्हता. मंगोलांचे धर्मांतर हे एक कटकारस्थान आहे, असे त्याला वाटे. १२९८च्या मंगोल वंशांशी झालेल्या युद्धात तर त्याने ३० हजाराच्या आसपास मंगोल सैनिकांची हत्या केली आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांना गुलाम बनवले.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

अल्लाउद्दिनच्या मर्जीतील सैनिक मोहम्मद शाह याने खिलजीची एक बेगम चिमना हिच्यासोबत आपले संबंध प्रस्थापित केले. बेगम व मोहम्मद शाह या दोघांनी मिळून खिलजीला संपवण्याचा घाट घातला. पण याचा सुगावा अल्लाउद्दिनला लागल्याचे कळताच मोहम्मद शाह पळून गेला. त्याने रणथंबोरचा राजा हम्मीरदेव याच्याकडे आश्रय घेतला. अल्लाउद्दिनला राजा हमीरदेववर स्वारी करण्यासाठी एवढे निमित्त पुरेसे होते. १२९९ साली राजा हमीर देवविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर १३०१ मध्ये त्याने पुन्हा रणथंबोरवर चढाई केली. यावेळी हम्मीर देवच्या सेनापतींनी केलेल्या फितुरीमुळे राजाचा पराभव झाला.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

१३०३ मध्ये राणी पद्मिनीच्या आकर्षणामुळे खिलजीने चितोडवर आक्रमण केले. त्या युद्धात चितोडचे राजा रावल रत्नसिंह मारले गेले व राणी पद्मिनीने जोहार करून आपले प्राण त्यागले, अशी कथा आहे. चितोडवर कब्जा केल्यानंतर १३०५ मध्ये माळवा तसेच १३०८ मध्ये राजस्थानच्या सिवाना किल्ल्यासह उत्तरेकडीलही अनेक प्रदेश जिंकले. सेनापती मलिक काफूरच्या मदतीने त्याने दक्षिणेकडे आपला साम्राज्यविस्तार केला. मदुराई, होयसळ , पंड्या या साम्राज्याचा नाश करून तिथेही त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

अल्लाउद्दिन खिलजीने पोलीस व्यवस्थेला संघटीत रूप दिले. कर व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. घरे आणि चरई क्षेत्रावर कर लावले. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर ५० टक्के लगान लावला. युद्धाच्या वेळी जी धनप्राप्ती होते त्याचा ८० टक्के हिस्सा हा सैनिकांवर आणि २० टक्के राज्यासाठी खर्च होत असे. त्यात बदल करून खिलजीने ८० टक्के राज्यासाठी आणि २० टक्के सैनिकांसाठी वापरण्याचा आदेश दिला. गुप्तहेर यंत्रणेमध्ये अनेक नवीन नियुक्त्या करून त्यात सुधारणा केल्या. वसुलीच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी ‘दीवाण-ए-मुस्तखराज’ या नवीन विभागाची स्थापना केली. नवीन डाक व्यवस्था तसेच नवीन रेशनिंग प्रणालीचीही सुरुवात अल्लाउद्दिन खिलजीने केली.

Alauddin Khilji
Alauddin Khilji

अशा तऱ्हेने साम्राज्याची घडी नीट बसवण्याच्या हेतूने खिलजीने अनेक प्रयत्न केले. असे म्हणतात की, त्याचा सेनापती मलिक काफूर यानेच कटकारस्थान करून अल्लाउद्दिन खिलजीची हत्या घडवून आणली. खिलजी एक उत्तम योद्धा आणि शासक होता. यात शंका नाही. परंतु राक्षसी महत्वकांक्षेपोटी त्याने जे मार्ग अवलंबले त्यामुळे त्याची ‘क्रूरकर्मा’ अशीच ओळख बनली.

Alauddin Khilji
Alauddin Khilji