FU Movie Review: खूप मेहनत घेऊनही फसलेला प्रयत्न

0
4674

FU Movie Review: खूप मेहनत घेऊनही फसलेला प्रयत्न

अनेकदा परीक्षेत पेपर लिहिताना आपल्या डोक्यात जे उत्तर असतं, ते नीटपणे पेपरावर उतरवता येत नाही. कधी कधी डोक्यातील विचारांपेक्षा प्रत्यक्षात लिहिताना भलतच काहीतरी लिहिलं जातं. अगदी असंच काहीसं एफयू – फ्रेंडशिप अनलिमिटेड हा सिनेमा बघताना होतं. दिग्दर्शक महेश मांजरेकरांना जे सांगायचे होतं ते नीटपणे मांडण्यात अपयश आल्याचंच चित्रपट बघितल्यावर राहून राहून वाटतं. वास्तव, अस्तित्व, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, नटसम्राट असे एकाहून एक सरस सिनेमाचे दिग्दर्शन केलेल्या महेश मांजरेकरांचा सिनेमा म्हणून तुम्ही जर हा सिनेमा बघायला जाल तर तुमच्या हाती निराशाच पडेल. कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो याप्रमाणे मांजरेकरांच्या या सिनेमाची गणती अपवादातच करावी लागेल.

FU-Marathi-Movie-2017
FU-Marathi-Movie-2017

म्युझिकल मुव्ही म्हणून या सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले पण या सिनेमातले एकही गाणे सिनेमा संपताना लक्षात राहत नाही. शिवाय १४ गाण्यांची गरज होती का, हा प्रश्न सिनेमा बघताना प्रत्येकाच्याच मनात येतो. कॉलेज लाइफ, तेव्हाचं स्वच्छंदी जगणं, पहिलं प्रेम, ती कॉलेजमधली भांडणं, मित्रांमधे असलेल्या गप्पा या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एफयूमध्ये पाहायला मिळतील.

FU-Marathi-Movie-Aakash-Thosar
FU-Marathi-Movie-Aakash-Thosar

आतापर्यंत आपण जे अनुभवलं तेच पुन्हा एकदा नव्याने बघण्याची एक संधी म्हणून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना हा सिनेमा आवडेलही. एफयू ही कथा आहे पाच जीवलग मित्रांची. असे मित्र जे एकमेकांसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यांचं असं एक जग असतं ज्या जगात बाकी गोष्टींना जागा नसते. पण कॉलेजमध्ये असताना अशा काही एक गोष्टी घडत जातात की त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. पण त्यांच्या मैत्रीमध्ये फरक होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तर सिनेमाच बघावा लागेल. आकाश ठोसर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, शुभम किरोडियन, पवनदीप या नावांच्या मांदियाळीत सर्वात जास्त जर कोण लक्षात राहत असेल तर तो शुभम किरोडियन.

Friends-Unlimited-FU-Marathi-Movie
Friends-Unlimited-FU-Marathi-Movie

आकाशला बघायला येणारा प्रेक्षक कधी शुभमकडे बघायला लागतो ते कळतच नाही. सिनेमा संपल्यानंतरही शुभम आणि त्याने साकारलेली व्यक्तिरेखा लक्षात राहते. सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने चांगले काम केले आहे. जर तुम्ही आकाश ठोसरचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा बघायला नक्की जाल.. पण तरीही फार वेगळा आकाश यात दिसेल अशी अपेक्षा ठेवून जाऊ नका. महेश मांजरेकर या माणसाने हा सिनेमा आपल्या नावावर तोलण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही, असेच म्हणावे लागेल.

FU Movie Images

Comments

comments

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.