स्त्रीचं दुहेरी जगणं संपेल का?

0
1037

स्त्रीचं दुहेरी जगणं संपेल का?

आजच्या काळातील स्त्रीच्या आकांक्षांना पंख फुटलेत. नवनवीन क्षितीजे तिला खुणावत आहेत. तिच्या पंखातही गरूडभरारी घेण्याचं बळ आलंय. प्रत्येक क्षेत्रात ती आपले पाय भक्कमपणे रोवते आहे. स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तिच्यातल्या कौशल्यांचं कौतुक होतंय. तिच्या महत्वकांक्षांना गगनही ठेंगणं भासू लागलं आहे. किती सुखद, आशादायक चित्र वाटतंय ना… पण ही नाण्याची एक बाजू आहे. तर दुसरीकडे आजही तिला जन्मण्याआधी गर्भातच मारून टाकलं जात आहे. जन्माला आलीच तर शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. आजही ती हुंड्यासारख्या अमानुष प्रथेची बळी ठरते आहे. बलात्कार, अँसिड हल्ले या असल्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांची ती शिकार बनते आहे. हे अमंगल चित्रही आजच्या काळातील स्त्रीचंच आहे.

एकविसाव्या शतकात जगात वेगाने होणारे बदल लक्षात घेता, स्त्रियांचा प्रत्येक क्षेत्रातला वाढता वावर, त्यांचं ठळकपणे जाणवणारं अस्तित्व नक्कीच दुर्लक्ष करण्याजोगं नाही. एकीकडे स्त्रियांनी नवनवीन यशाची शिखरे गाठत इतिहास रचला आहे. प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलं आहे. ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. पण दुसरीकडे मात्र सतत तिच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या कानावर आदळत राहतात. तेव्हा एक घोर निराशा मनाला पोखरत जाते. एक काळकभिन्न वास्तव अंगावर येतं. ही परिस्थिती कधीच बदलणार नाही असा प्रखर निराशावाद जन्माला येतो.

सगळीकडे स्त्रीचं सबला असणं आणि अबला असणं हेच अधोरेखित होत आहे. त्या दोन्हींच्या मध्ये असणाऱ्या स्त्रीत्वाच्या छटांचं काय ?दोन ध्रुवांमधली ही दरी, त्यातला विरोधाभास मोजता यायला हवा. अत्यंत कुशल, कार्यक्षम, आपला प्रत्येक निर्णय स्वतःच घेणारी स्त्री आणि अनेक बंधनांच्या बेड्यांमध्ये जखडलेली, फक्त श्वास घेणे वगळता अन्य कोणत्याच निर्णयाचे स्वातंत्र्य नसलेली बंदिनी, या दोन टोकांच्या मध्ये असणारा अजून एक स्त्री वर्ग आहे. जो आशानिराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खातो आहे. पूर्णतः सबला आणि पूर्णतः अबला या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांच्या तुलनेत हा मधला वर्ग जास्त प्रमाणात आहे आणि तरीही तो दुर्लक्षित आहे.

या मधल्या स्त्री वर्गाच्या जगण्याला बाईपणाच्या अनेकविध छटा आहेत. ती स्वतंत्रही आहे. पण तितकीच बंधनात अडकलेली आहे. ती सर्व बंधने झुगारून नव्या जगात मुक्तपणे उडू पाहणारी आहे. तितकीच पिढ्यानपिढ्या मनावर कोरलेल्या बाईपणाच्या जुन्या व्याख्येतून, त्या मानसिकतेतून ती बाहेर पडलेली नाही. जुनी चौकट तर तिने मोडली. पण तिचं जगणं नव्या चौकटीमध्ये बंदिस्त झालं आहे. या चौकटीचा अर्धा हिस्सा जातीसंस्था, पुरुषप्रधान व्यवस्था, मासिक पाळीबद्दलचे अवघडलेपण, आईपणा आणि बाईपणाच्या जुन्या समजुतींचा आहे. तर उरलेला अर्धा भाग खुल्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेली स्पर्धा, करीअरच्या नव्या वाटा यांचा आहे. तीव्र स्पर्धेवर आधारलेली अर्थरचना;त्यातून पुढे झेपावण्याची इच्छा, पण घरीदारी मात्र ‘नोकरी कर पण मानमर्यादा, काळवेळ सांभाळून’ असे प्रेमाचे मिळणारे सल्ले. या परिस्थितीमध्ये तिची सतत कुचंबणा होत राहते.

त्यात लग्नाचा परीघ अजूनही बदलला नाही. आधीच्या काळात तर फक्त घरकाम करता येणंच पुरे होतं. घराचं घरपण सांभाळणं हेच तिच्या जीवनाचं इतिकर्तव्य असे. पण आता तिच्याबद्दलच्या अपेक्षांना अजून जोर चढला आहे. घरपण, आईपण, बाईपण हे सगळे ‘पण’ तर तडीस न्यायचेच. त्यात नोकरीच्या ‘पणा’ ची भर पडली आहे. तो ‘पण’ही पूर्ण करायचा. एका मोठ्या कंपनीत किंवा सरकारी नोकरीमध्ये तिला पाच आकडी पगार तर हवाच, शिवाय गृहिणी म्हणूनही तिने तिच्या जबाबदाऱ्या निभावल्याच पाहिजेत. ती आदर्श सून हवी, पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी पत्नी हवी. चांगलं चुंगलं खाऊ घालणारी सुगरण हवी. घरी आल्यागेल्यांचे स्वागत करणारी, सगळे सणवार सांभाळणारी सुगृहिणी हवी आणि ‘करीअर वुमन’ ही हवी. इतक्या भूमिका तिने अत्यंत हसतमुखाने पार पाडाव्यात ही सगळ्यांची अपेक्षा. अशा प्रकारे अगदी ‘अष्टभुजा’ असल्याच्या थाटात वावरत असताना, घराबाबतच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये मात्र ती एक पाऊल मागेच. तो हक्क पुरुषांचा.

इतकं सगळं असूनही ती त्या चौकटीत राहूनच आपला आनंद शोधायचा तुकड्या तुकड्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत राहते. कितीतरी ताण सोसूनही आशावादी राहते. कधी सामंजस्याने, कधी आवाज चढवून स्वतःच्या मनाजोगती गोष्ट पदरात पाडून घेते. मनाचा कणखरपणा वाढवत ही दुहेरी भूमिका पार पाडण्याची कसरत ही स्त्री करते आहे. अतिशय शुभ्र पांढरा रंग आणि तितक्याच पराकोटीचा काळा रंग यांच्या मधे असणाऱ्या करड्या रंगासारखी या स्त्रियांची अवस्था आहे. स्त्रियांच्या या प्रश्नांचा, तिच्या या जगण्याचा वेध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा असे मनापासून वाटते.