लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक

0
650
लैंगिक - Being Marathi
लैंगिक - Being Marathi

लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक

लैंगिकता किंवा सेक्स (Sex) हा शब्द उच्चारला तरी आपल्याकडे अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. ज्या कोणी हा शब्द उच्चारला असेल त्याच्याकडे ‘खाऊ की गिळू’ या नजरेने पाहिले जाते. अगदी स्वतःला सुशिक्षित, पुरोगामी म्हणवणारी माणसेही या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत. जी सहजसुंदर नैसर्गिक भावना आहे, तिला अपवित्र कसे काय ठरवले जाते, हे खरेच न समजण्याजोगे आहे.

या विषयाचा मागोवा घेत जर आपण आपल्या प्राचीन संस्कृतीपर्यंत पोहचलो तर  या विषयाचा किती गाढा अभ्यास पुरातन काळी केला गेला आहे. हे आपल्याला समजेल. हिंदू धर्मामध्ये चार पुरूषार्थ  सांगितले गेलेत.  धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातील काम म्हणजेच (Sex) हा शब्द ध्यानात घेतला तर कळेल की, या भावनेला किती महत्त्व आहे.  ज्या गोष्टीला चारी पुरूषार्थांमध्ये स्थान दिले गेले आहे, ती वाईट किंवा चुकीची नक्कीच नाही.  पण चुकीच्या पद्धतीने जर या विषयाचा प्रसार झाला तर मात्र हानीकारक आहे. आणि हल्ली हेच घडते आहे. जे अतिशय दुर्दैवी आहे. काम म्हणजेच (Sex) ही प्रत्येक सजीव प्राण्याची गरज आहे, जी त्या त्या वेळी पूर्ण होणे गरजेचे आहे. इतकं साधं सोपं आहे हे. तरीही त्याला नैतिकता, श्लील-अश्लील अशा सगळ्या व्याख्यांमध्ये गुरफटवून त्याचं मूळ स्वरूपच हरवलं आहे.

प्राचीन काळी मंदिरावरील भिंतींवर संभोगशिल्पे कोरलेली असत. लैंगिक शिक्षणाचा तो एक उत्तम मार्ग होता. महर्षी वात्सायनांसाऱख्या महान ऋषींनी ‘कामसूत्र’ नावाचा ग्रंथ लिहून या विषयी मार्गदर्शन केले. निव्वळ वात्सायनच नाही तर  पद्मश्रीज्ञान यांचा नागरसर्वस्व, जयदेव यांचा रतिमंजरी, कल्याणमल्ल लिखित अंनंगरंग, कोक्कोक लिखित रतिरहस्य असे अनेक ग्रंथ लैंगिक शिक्षणावर (Sex Education) आधारलेले आहेत. ज्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता टाळून योग्य ते मार्गदर्शन केले गेले आहे. पण हल्ली या ग्रंथांचा संदर्भही कोणाच्या लक्षात नसेल.

kamsutra - Being Marathi
kamsutra – Being Marathi

इंटरनेटवरील सहज उपलब्ध होणारी चुकीची माहिती, अश्लील व्हीडीओ पाहून तरूणच नाही तर लहान मुलेही हाताबाहेर जाऊ लागली आहेत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या विषयाबाबत उघडपणे न बोललं जाणं. कुतुहलापोटी एखादी गोष्ट विचारली आणि तिचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर ते कुतुहल वाढतच जातं.  आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मुलं दिसेल तो मार्ग अवलंबतात आणि मग एखादी चुकीची घटना त्यांच्या हातून घडून जाते. यासाठी मुलांना योग्य त्या वयात योग्य ते मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे आहे. मुलांमध्ये खूप उर्जा असते. ती योग्य त्या दिशेने प्रवाहित व्हावी, यासाठी त्यांच्या पालकांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Sex Education बद्दल बरंच काही ऐकलं वाचलं आहे. पण प्रत्यक्षात ते शिक्षण कशा प्रकारे दिलं जात आहे किंवा खरच दिलं जात आहे का? दिलं जात असेल तर ते योग्य पद्धतीने दिलं जातंय का ? या सगळ्याची नीट पडताळणी होणं खूप गरजेचे आहे. उघडपणे या विषयावर बोलून त्याबद्दलचं कुतुहल शमवणं खरंच खूप आवश्यक आहे. अन्यथा बलात्कार, पॉर्नोग्राफीसारख्या समस्या अजून वाढीला लागतील. त्यांच्या विळख्यातून वेळीच आजच्या तरूण पिढीला बाहेर काढणं ही आजची गरज आहे.