माजी सैनिक बन्सी नारायण गाडे

0
638
Being Marathi
Being Marathi

माजी सैनिक बन्सी नारायण गाडे

आमच्या काळात 303 रायफल असायच्या
बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा परत बोल्ट वडायचा ट्रिगर दाबायचा… पार हातं बोटं सुजुन जायची,कच्ची कणसं खाऊन आमी देशासाठी लडलो एके काळी,चीन नं सप्लाय लाईन तोडली होती आमची…तीन लढाया लढलोय मी,पाकिस्तानासोबत दोन आणि चीन सोबत एक.
ही छातीवरती आहे तीच संपत्ती आमची. अंगावर काटे आणनारे शब्द होते त्यांचे.

Indian Army
Indian Army

बन्सी नारायण गाडे.
वय 85
माजी सैनिक. लान्स नायक (ब्रिगेड आॅफ गार्ड,हेडक्वार्टर नागपुर)

आज जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद इथं ध्वजवंदन कार्यक्रमानिमित्त गेलो आणि हे माजी सैनिक दुरुन दिसले.
हे छाती भरगच्च मेडल्स नी भरलेली. थोडं बोलावं म्हणुन दबकतंच बोललो जरा (म्हटलं आर्मीचा माणुस,उगाच चिडला बिडला तर काय घ्या..) मी विचारलं तर म्हणतात कसे

“आरं छातीवर जागा नव्हती म्हणुन दोन मेडल घरीच ठेवुन आलोय.” त्यांच्या छातीवर दोन नागा हिल्स मेडल दोन संग्राम मेडल दोन समर सेवा मेडल
एक रक्षा मेडल 1965 एक पच्चीसवी स्वतंत्रता जयंती मेडल एक आहत (casualty in 1965) मेडल
आणि एक मिझो हिल्स मेडल असे एकुण दहा मेडल होते आणि लावायला जागा नाही म्हणुन दोन मेडल्स ते घरीच ठेवुन आलेले.

सैनिकांबद्दल मला उत्सुकता. मी विचारत गेलो ते सांगत गेले.कार्यक्रम सोडुन दोघं हेच बोलंत होतो.युद्धाच्या आठवणी सांगत माणुस पार हरवुन गेला होता. “65 च्या लढाईत मी एक महिना मिसिंग होतो,सरकारनं शहीद म्हणुन घोषित केलेलं मला.दिल्लीत राजपथावरच्या इंडीया गेटवर माझं नाव पण कोरलंय शहीद म्हणुन पण मी जिवंत होतो,पाकीस्तानमधेच एका डाॅक्टरबाईनं माझा इलाज केला आणि महिन्याभरानंतर युद्धकैद्यांच्या अदलाबदलीत मला भारतात पाठवलं.

India Gate - Being Marathi
India Gate – Being Marathi

मी पहिल्या भारत चीन युद्धातही लढलोय,ठिकाण निश्चित आठवत नाही आता वय झालं पण लढाई मात्र जशीच्या तश्शी आठवतीये. आमची सप्लाय लाईन कापली होती चीन्यांनी,कच्चे कणसं खात लढलोय आम्ही त्या वेळी देशासाठी,अक्षरशः गोळ्यांचा पाऊस असायचा त्यातनं MMG फायर केलंय मी.माझ्या सोबतचे साथी शहीद झाले लई.माझ्यापण कमरेत गोळी लागली होती,एक डाव्या पायाला चाटुन गेली.आमचा साहेब.. त्याचंपण नाव आठवत नाही पण लई जिगरबाज होता.

आधी आमची बटालियन गार्डस् ची होती मग आम्हाला आर्मीत पाठवलं,राजस्थान-कोटा ला हेडक्वार्टर होतं माझं,आता ते नागपुरला हलवलंय. जेव्हा पंतप्रधानांचा बाॅडीगार्ड होतो तेव्हा जवाहरजींनी हेच हात हातात घेतलेले. ह्या हातानं त्यांचा स्पर्श अनुभवलाय,मग इंदिराबाई आल्या लयच जिगरबाज बाई. आर्मी कमांड दवाखान्यात असताना मला बोल्ली होती ‘तबियत कैसी है जवान..!’

बर्याच ठिकाणी पोस्टींग होती,नागालँड मिझोराम मधे पण सर्विस केलोय,तीन लढाया लढलोय.., दोन पाकिस्तान सोबत आणि एक चीन सोबत
आर्मीत बरं असतंय,देश बघायला मिळतोय

Indian Army IA - Being Marathi
Indian Army IA – Being Marathi

बराच वेळ दोघं बोलत होतो,त्यांनी माझ्याबद्दल विचारलं. म्हणले तु लैच चौकस दिसतोस. बरंय.. नायतर आजकाल कोन ह्या मेडलला आणि ह्या देहाला ईच्यारत नाही.बरं वाटलं तुला बोलुन. त्यांना चलता येत नव्हतं काठी होती हातात,वय 85 पण कणा अजुनही सैनिकी शिस्तीचाच,शेवटी हाताला धरुन त्यांना गेटपर्यंत सोडलं. त्यांच्यासोबत चलताना मी बुबुळं फिरवत एकदा आजुबाजुला पाहीलं तर सारे त्यांच्या छातीवरच्या 10 मेडल्सकडं आदरयुक्त कुतुहलानं पाहतं होते.

मनात म्हटलं.. क्या बात है..
यही तो रुतबा होता है फौजी का..
यही तो शान होती है..!!!
#फौजी #शान #जय_हिंद_की_सेना

(15 आॅगस्ट/26 जानेवारी ह्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोर्ट/SP office आणि प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणी माजी स्वातंत्र्य सैनिक/माजी सैनिक आवर्जुन येतात तेव्हा जर असे अनुभव घ्यायचे तर त्या त्या ठिकाणी त्या त्या दिवशी आवर्जुन जावं आणि ह्या लोकांना गाठुन,बोलतं करुन आपली झोळी भरुन घ्यावी,कारण ही अवली माणसं कर्मानी आणि अनुभवांनी प्रचंड श्रीमंत असतात ? )

Indian Army - Being Marathi
Indian Army – Being Marathi