मासिक पाळी म्हणजे काय ? मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज नक्की वाचा

0
2812

मासिक पाळी येते म्हणजे काय ?

मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. जस-जशी एक मुलगी मोठी होत जाते, तिच्या शरीरात अनेक बदल घडतात. शारीरिक व मानसिकरीत्या तिला हे बदल जाणवायला लागतात. त्यापैकी एक बदल म्हणजे एन्डोमेट्रिअम व रक्त गर्भाशयातून होणारे उत्सर्जनआणि त्यामुळे दर महिन्याला येणारी मासिक पाळी. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. परिणामी ती गरोदर राहून आई बनू शकते.

सर्वप्रथम स्त्री प्रजननसंस्थेची रचना समजून घेतली पाहिजे. ह्या रचनेत अनेक अवयव आहेत जसे की – अंडाशय (ovaries), अंडनलिका (fallopian tube), गर्भाशय (uterus), योनिमार्ग (cervix) आणि योनी (vagina). अंडाशये बदामाच्या आकाराची असतात व त्यात हजारो लहान लहान बीजांडे असतात, जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.

मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या भिंतींवर एन्डोमेट्रियम नावाचा जाड थर तयार होतो. याच वेळी अंडाशयातून एक बीजांड अंडनलिकेतून गर्भाशयात जाते. ह्या बीजांडाचा शुक्रजंतुशी संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते व एन्डोमेट्रियमचा थर गर्भाचे पोषण करतो. बीजांडांचा शुक्रजंतुशी संयोग झाला नाही तर एन्डोमेट्रियमच्या थराचा उपयोग नसतो. अशा वेळी हा थर व त्यात असलेले रक्त योनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. ह्या प्रक्रियेस मासिक पाळी असे म्हणतात व ही प्रक्रिया ३-७ दिवसात पूर्ण होते.

दोन मासिक पाळीच्या दरम्यान २८ दिवसांचा कालावधी असतो. शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचप्रकारे प्रत्येक मुलीची मासिक पाळी देखील वेगळी असते. मुलींच्या मासिक पाळीचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. काही मुलींना १५ दिवसात तर काहींना ३ महिन्याच्या कालांतराने पाळी येते. पाळी नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो. पहिल्या वर्षांनंतर पाळी नियमित होणे गरजेचे आहे व स्त्राव प्रत्येक महिन्यात सारखे दिवस असला पाहिजे. पाळी साधारण २८ दिवसांच्या कालांतराने येते पण हा कालावधी २०-३५ दिवस असू शकतो.

2) पाळी कधी सुरु होते ?
मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक ओंली सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते.

3) मासिकपाळी सुरु झाल्यावर मुलीने प्रथम काय करावे ?
रक्तस्राव होतो हे पाहून तिने घाबरून जाऊ नये. तिने आईला सांगावे अथवा घरातील वयस्कर स्त्रीला सांगावे.

4) पाळी आल्यावर मुलीच्या आईने किंवा मोठ्या बहिणीने तिला कसे समजावून सांगावे ?
प्रथम तिची भीती कमी केली पाहिजे. कपडयांच्या नीट घडया घ्यायला सांगितले पाहिजे. हा एक शरीर धर्म आहे. तू आता मोठी झाली आहेस, शहाणी झाली आहेस. तू चांगले वागले पाहिजे, तसेच काय काळजी घ्यायची हेही नीट समजावून सांगितले पाहिजे.

5) मासिकपाळी येणे म्हणजे निसर्गाचे वरदान आहे असे का म्हणतात ?
माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची निसर्गाची योजना आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. म्हणूनच मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात. यामुळेच मुलगी विवाहानंतर योग्य वेळी आई होऊ शकते.

6) मासिक पाळीत रक्तस्त्राव कशामुळे होतो ?
मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.

7) मासिकपाळी चालू असताना, पूर्ण विश्रांतीची गरज असते का ?
मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची अजिबात गरज नाही. अतिकष्टाची कामे करू नयेत. पण घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.

? पाळी लवकर आली नाही तर काय करावे ?
मुलीला १६ वर्षांपर्यंत जर पाळी आली नाही तर डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जर मुलगी अतिशय अशक्त असेल तर तिच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे.

9) मासिकपाळीत रक्ताचा रंग कसा असावा ?
मासिकपाळीतील रक्त हे गर्भाशयातील अस्तराने मिश्रीत असल्यामुळे ते थोडेसे काळसर व लहान लहान गाठींनीयुक्त असते. जर अशा लहान गाठी स्त्रावासोबत बाहेर पडत असतील तर फार घाबरण्याची गरज अन्ही. परंतु जर त्याचे प्रमाण वाढले तर मात्र डॉक्टरांना दाखवावे.

10) मासिक पाळी किती दिवसांनी येते ?
मासिक पाळी दर २८ दिवसांनी येते पण कोणाला २९/३० दिवसांनी तर काहींना २४/ २५ दिवसांनी असा थोडा फार फरक पडू शकतो. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ती अगदी नियमितपणे येईल असे नाही. त्यातही दोन दिवस अलीकडे-पलीकडे असा फरक पडू शकतो. पण पुढे काही दिवसांनी त्यात नियमितपणा येतो.

11) पाळी आल्यावर किती दिवस अंगावर जाते ?
पाळी आल्यावर २ ते ६ दिवस अंगावर जाऊ शकते. सुरुवातीस त्यात थोडा अनियमितपणा असू शकतो व अंगावरही कमी जास्त प्रमाणात जाऊ शकते पण काही दिवसांनी त्यातही नियमितपणा येतो.

12) पाळीच्या वेळी अंगावर जास्त जात असेल तर काय काळजी घ्यावी ?
पाळीच्या वेळी अंगावर जास्त जात असेल तर गर्भाशय, बीजांडकोष किंवा गर्भनलिका यांना सूज आली असण्याची शक्यता असते किंवा इतर काहीदोष निर्माण झालेला असतो. आंतररसातील नियमन बिघडल्याने किंवा रक्तघटकांच्या कमतरतेमुळेही रक्त जास्त जाते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

13) मासिकपाळी आल्यावर इतर काही त्रास होतो का?
मासिक पाळी आल्यावर किंवा येण्यापूर्वी थोडे फार पोट दुखणे, झोप न लागणे, कंबर दुखणे, डोके दुखणे, अंग दुखणे असा त्रास होऊ शकतो. कारण हा त्रास तात्पुरता असतो व शरीर प्रक्रियेत बदल झाल्याने होत असतो. पुढे पुढे हा त्रास कमी होत जातो. तथापि अधिक त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवून घ्यावे.

14) मासिक पाळीतील पोटदुखीतकाय काळजी घ्यावी ?
काही मुलीना पाळी सुरु होण्याअगोदर २-३ दिवस पोट दुखीचा त्रास होतो व पाळी सुरु झाली की त्रास थांबतो. बऱ्याचवेळा हा त्रास तात्पुरता असू शकतो आणि थोड्याफार उपचाराने थांबू शकतो. पण एखादेवेळी ओटीपोटात आजारही असू शकतो. त्यामुळे जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाने योग्य असते.

15) पाळीच्या काळात स्वच्छतेसंबंधी काय काळजी घ्यावी ?
पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी. या काळात कापडाच्या घडया वापराव्या लागतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात. त्याचे कापड नीट स्वच्छ धुवून घ्यावे. पाळीचे कपडे मोकळ्या हवेशीर जागी, शक्यतो सुर्यप्रकाशात वाळवावे. घाणीत, अडगळीच्या ठिकाणी कपडे वाळवू नयेत. जाळीदार कापड बाजारातून आणून त्यात कापूस घालून चौकोनी लांबट घडया करता येतात. बाजारात मिळणारे सानीटरी नापकीन हे चांगले असले तरी अनेकांना परवडणारे नसतात. त्यामुळे कापड स्वच्छ धुवून, कोरडे केलेलेच वापरावे व प्रत्येक २-३ तासांनी बदलावेत.

16) मासिक पाळी पुढे ढकलता येते का ? तसे करणे कितपत योग्य आहे ?
कुटुंबनियोजानाकरिता वापरण्यात येणाऱ्या गोळ्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी घेतल्याने मासिक पाळी पुढे ढकलता येते, परंतु असे करणे योग्य नाही. कारण या गोळ्यांचे स्त्रियांवर दुष्परिणाम होऊ शकतात. कधी तरी प्रवास टाळणे अशक्य असल्यास किंवा अगदी अडचणीच्या काळात एखादे वेळेस असेल तर हरकत नाही. पण वरचेवर फक्त कौटुंबिक सामाराम्ब्ठ किंवा धार्मिक सोहळ्यांमध्ये शिवता शिवत होऊ नये महणून गोळ्या घेणे योग्य नाही, शक्यतो मासिकपाळी पुढे ढकलणे टाळावेच.

17) मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवणे योग्य की अयोग्य ?
गर्भाशयाची आतील बाजू शरीरात जंतूप्रवेश करू देत नाही. मासिक पाळीच्या वेळी संरक्षक आवरण निघून गेल्यामुळे हा भाग नाजूक बनलेला असतो. अशा वेळी जननेंद्रियाचा सांसर्गिक रोग असलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास हे जंतू प्रथम योनीमार्फत गर्भाशयात प्रवेश करतात. त्यामुळे स्त्रीला संभोगामध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते. स्वच्छता व दोघांचीही मानसिक तयारी असल्यास संभोग करण्यात धोका नाही.